अलिबागला आता अखंडित वीज; भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 23:53 IST2020-06-18T23:52:40+5:302020-06-18T23:53:07+5:30

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेअंतर्गत ८९ कोटी खर्च

Alibag now has uninterrupted power | अलिबागला आता अखंडित वीज; भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प

अलिबागला आता अखंडित वीज; भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प

अलिबाग : शहरात आता यापुढे विजेचे खांब पडणार नाहीत; अथवा वीजपुरवठाही खंडित होणार नाही. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल ८९ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च येणार आहे.

जिल्ह्यात चक्रीवादळामुळे ३ जूनला विजेचे खांब, तारा तुटून मोठ्या प्रमाणात महावितरणचे आर्थिक नुकसान झाले आहे. १९०५ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अद्यापही शेकडो गावांतील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. अलिबाग शहरामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायालय, जिल्हा कोषागार यांसह अन्य प्रमुख सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वीजपुरवठा होणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचे काम आता अलिबागमध्ये सुरू करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीपासून प्रकल्प रखडला होता. मात्र आता या कामाला गती आली आहे. या प्रकल्पासाठी ८९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ४५ किमी लांबीची उच्च दाबाची वीजवाहिनी तर ५५० किमी लांबीची लघुदाब वीजवाहिनी जमिनीतून टाकण्यास लिना पॉवर टेक कंपनीने सुरुवात केली आहे. अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत आणि वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग या योजनेत समाविष्ठ करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे. अलिबाग पंतनगर येथून जमिनीतून वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. २४ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर आहे, असे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अद्ययावत यंत्राद्वारे हे काम सुरू आहे. पावसाळ्यातही हे काम सुरूच राहणार असल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.

नवीन सबस्टेशन बंद
अलिबाग-चेंढरे येथे अत्याधुनिक सबस्टेशन उभे करण्यात येणार आहे. सर्वसामान्यत: सबस्टेशन ही खुली असतात. मात्र नवीन सबस्टेशन हे बंद असणार आहे. त्यामुळे धोका कमी होणार आहे.

Web Title: Alibag now has uninterrupted power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.