जिल्हा शल्यचिकित्सक पदी पुन्हा अजित गवळी
By Admin | Updated: October 14, 2016 06:43 IST2016-10-14T06:43:23+5:302016-10-14T06:43:23+5:30
अनेकदा बदल्या आणि असमर्थनीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेले, रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात कार्यरत रायगड जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्हा शल्यचिकित्सक पदी पुन्हा अजित गवळी
अलिबाग : अनेकदा बदल्या आणि असमर्थनीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेले, रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात कार्यरत रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित ए.गवळी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांती अखेर शासनाला ‘रायगड जिल्हा शल्यचिकित्सक’ याच पदावर नियुक्त करण्याचे आदेश पारित करावे लागले आहेत. गेल्या तब्बल १५ महिने मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई करणारे डॉ. गवळी यांना न्याय मिळाला आहे.
गवळी यांनी जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया करुन रायगडमधील जनसामान्य रुग्णांना मुंबई वा अन्यत्रच्या रुग्णालयात जाण्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाचविला होता. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल ५९० शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या करुन राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय विमा कंपनीकडून तब्बल ७० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले होते. दररोज दोन शस्त्रक्रिया ते १९८७ पासून करीत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांना असमर्थनीय कारणास्तव अचानक सेवेतून निलंबित केले होते. त्या निलंबनास डॉ.गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या ७ आॅक्टोबर २०१५ रोजी डॉ.गवळी यांच्या बाजूने निकाल देवून त्यांना रायगड जिल्हा शल्यचिकित्सक पदीच नियुक्त करण्याचे आदेश शासनाला दिले होते. परंतु त्या आदेशाच्या अंमलबजावणीस देखील तब्बल एक वर्षाचा कालावधी शासनाच्या लालफितीच्या कारभाराने लावला. (विशेष प्रतिनिधी)