भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
By निखिल म्हात्रे | Updated: October 18, 2023 23:44 IST2023-10-18T23:44:03+5:302023-10-18T23:44:35+5:30
सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी भर समुद्रात असे प्रकार घडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
अलिबाग - मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान होणारी जलवाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. आज सकाळी मांडव्याहून गेट वे ऑफ इंडिया कडे निघालेली प्रवासी जलवाहतूक करणारीअजंठा लॉन्च भर समुद्रात बंद पडली. त्यानंतर बऱ्याच वेळ प्रतीक्षेनंतर दुसरी लॉन्च बोलावून प्रवाशांना जीवाचे हाल करीत हलविण्यात आले. सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी भर समुद्रात असे प्रकार घडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळी अलिबाग येथून अजंठा लॉन्च सेवेच्या बसमधून सकाळी 11.45 वाजता प्रवाशांनी प्रवास सुरू केला. प्रवाशांना घेवून मांडव्याहुन दुपारी 12.45 वाजता गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाली. अर्ध्या तासामध्येच अचानक ही लॉन्च भर समुद्रात बंद पडली. अचानक लॉन्च बंद पडल्याने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली. महिला, बालके रडू लागली. अनेक प्रयासा नंतरही लॉन्च सुरू होत नसल्याने दुसरी लॉन्च बोलावण्यात आली. तासभर प्रतीक्षेनंतर आलेल्या लॉन्च मध्ये भर समुद्रात बंद पडलेल्या लॉन्च मधून प्रवाशांना हलविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र हा प्रकार धोकादायक होता. जर काही चूक झाली असती ते प्रवासी थेट समुद्रात पडण्याचा धोका होता.
दोन वर्षांपूर्वी अजंठा लॉन्चला मांडवा येथे जलसमाधी मिळाल्याची घटना घडली होती. अनेकदा ही लॉन्च भर समुद्रात बंद पडल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याऱ्या या लॉन्च सेवेवर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे.
दरम्यान अजंठा लॉन्च सेवेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही