रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधातील आंदोलन; पोलीस आणि शेतकऱ्यात झटापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:21 IST2021-01-28T00:21:16+5:302021-01-28T00:21:33+5:30
रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला

रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधातील आंदोलन; पोलीस आणि शेतकऱ्यात झटापट
कर्जत : तालुक्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईनमध्ये प्रकल्प बाधित झालेल्या १० गावातील ४९ शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी शासनाकडून न्याय मिळत नसल्याने २६ जानेवारी रोजी आंदोलन केले. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे आंदोलन स्थळी उपस्थित झाल्यानंतर आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण या ठिकाणी इशारे देण्यासाठी आलो नाही तर पाईपलाईन उखडून टाकण्यासाठी आलो आहोत. भाषणबाजी करून वेळ घालवायचा नसून आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी निर्धार करण्यासाठी आलो असल्याने आता कोणाशीही चर्चा करायची नाही असे जाहीर करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांच्या रेट्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पुन्हा पोलिसांचे सुरक्षा कठडे तोडण्याचा प्रयत्न केला.या झटापटीत पोलीस, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाईपलाईन उखडवून टाकण्यासाठी जाऊ देत नसल्याने शेवटी आंदोलक तेथून निघून रस्त्यावर येऊन बसले.
यावेळी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दाचा मान राखत शासनाची भूमिका शेतकरी वर्गाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितली. त्यावर शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे केशव तरे, रमेश कालेकर, सुरेश खाडे आणि भास्कर तरे यांनी रस्त्यावर सुरू केलेले आंदोलन रात्री आठ वाजता थांबविण्यात आल्याचे सांगितले.