आगरदांडा जेट्टीत शौचालय नाही!
By Admin | Updated: November 10, 2016 03:36 IST2016-11-10T03:36:32+5:302016-11-10T03:36:32+5:30
कोट्यवधी रु पये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आगरदांडा येथे भव्य दिव्य स्वरूपात जेट्टी बांधली आहे. परंतु खर्च अमाप मात्र प्रवाशांना कोणतीही सुविधा देण्यात

आगरदांडा जेट्टीत शौचालय नाही!
नांदगाव/ मुरुड : कोट्यवधी रु पये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आगरदांडा येथे भव्य दिव्य स्वरूपात जेट्टी बांधली आहे. परंतु खर्च अमाप मात्र प्रवाशांना कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. आज या जेट्टीवरून दिवसाला शेकडोच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत आहेत. जंगल जेट्टीमुळे तर मोठमोठी वाहने ये-जा करून दळणवळणाचे उत्तम साधन प्राप्त झाले आहे. श्रीवर्धन, रत्नागिरी हे अंतर खूप कमी झाले असून बहुतांशी लोक आपली वाहने आगरदांडा जेट्टी येथे नेऊन हा सुखकर प्रवास करीत असतात. एवढी मोठी जेट्टी बांधली परंतु प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा करण्यात न आल्याने आमदार पंडित पाटील यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
या जेट्टीबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले की, येथून शेकडो प्रवासी प्रवास करतात, परंतु प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात आलेली नाही. तसेच जेट्टी बांधल्यावर आजूबाजूचा काही किलोमीटरचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी ही मेरीटाईम बोर्डाची होती परंतु येथे सुद्धा जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. मोठमोठ्या जेट्ट्या बांधावयाच्या व मूलभूत सुविधा देताना बोर्डाला विसर का पडतो असा प्रतिप्रश्न आमदार पाटील यांनी केला आहे. जेट्टीचे काम होत असतानाच मूलभूत सुविधेकडे लक्ष देणे क्र मप्राप्त होते, परंतु ठेकेदारांना जास्त फायदा कसा होईल याबाबीकडे अधिक लक्ष दिल्याचे त्यांच्या या कृतीमधून दिसून येत आहे. या कामाबाबत माझी स्पष्ट नाराजी असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून मेरीटाइम बोर्डाला जाब विचारणार असल्याचा स्पष्ट इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)