पाल्यांना शाळेत न पाठविल्याने प्रशासन नमले

By Admin | Updated: July 31, 2015 23:07 IST2015-07-31T23:07:32+5:302015-07-31T23:07:32+5:30

कोलाड येथील एम.पी.एस.एस. इंग्लिश माध्यमिक स्कूलच्या वाढविलेल्या भरमसाट व अवास्तव फीविरोधात पालकांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनास अखेर यश

The administration did not send the children to school | पाल्यांना शाळेत न पाठविल्याने प्रशासन नमले

पाल्यांना शाळेत न पाठविल्याने प्रशासन नमले

रोहा : कोलाड येथील एम.पी.एस.एस. इंग्लिश माध्यमिक स्कूलच्या वाढविलेल्या भरमसाट व अवास्तव फीविरोधात पालकांनी गेल्या दोन दिवसांपासून पुकारलेल्या आंदोलनास अखेर यश आल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
वाढीव फीविरोधात या स्कूलविषयी पालकांमध्ये तीव्र नाराजीची भावना दिसून येत होती. वाढलेली फी गोरगरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नव्हती. या कारणास्तव मागील पंधरा दिवसांपूर्वी व्यवस्थापन व पालक यांच्यात बैठक होऊन २५ जुलैपर्यंत याबाबत तोडगा काढला जाईल अशाप्रकारचे आश्वासन व्यवस्थापनाकडून मिळाल्याने व २५ जुलै रोजी फीवाढीसंदर्भात पालकांचे पूर्णपणे समाधान न झाल्याने अखेर २९ जुलै रोजी आपल्या पाल्यांना शाळेतच न पाठविण्याचा धाडसी निर्णय पालकांनी घेतला होता.
याबाबत तोडगा काढण्यासाठी स्कूल व्यवस्थापन, प्रशासन व पालकवर्ग यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन रमेश महाडिक, व्हा. चेअरमन सुनील महाडिक, मुख्याधिकारी वैशाली महाडिक, पं.स. गटसमन्वयक नारायण गायकर, पो.अधिकारी वडते, संजय सानप, रमाकांत खंडेलोट, संतोष वाईत आदींसह सुमारे ३०० पालक उपस्थित होते. या बैठकीत वाढीव फी कमी करण्याचे तसेच यापुढे फीसंदर्भात स्कूलबाबत अन्य कोणताही निर्णय हा पालकसभा आयोजित करुन घेतला जाईल अशाप्रकारचे ठोस आश्वासन प्राप्त झाल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले व पाल्यांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. (वार्ताहर)

फीवाढीचे फुटले पेव
सध्या सर्वत्र इंग्लिश माध्यमाच्या शाळांत फीवाढीचे पेव फुटले असल्याने कोलाड एम.पी.एस.एस. येथे जसा पालकांना फीवाढीविरोधात दिलासा मिळाला तशा प्रकारचा निर्णय तालुक्यातील सर्व इंग्लिश माध्यमिक स्कूलमध्ये व्हायला हवा. गरीब पालक मुलांनी इंग्रजी शिक्षण घ्यावे असे स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी वाटेल ती मेहनत देखील ते घेत आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आबा शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: The administration did not send the children to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.