आदर्श ग्रामला ‘सीएसआर’चे बळ
By Admin | Updated: August 28, 2015 23:19 IST2015-08-28T23:19:05+5:302015-08-28T23:19:05+5:30
स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट

आदर्श ग्रामला ‘सीएसआर’चे बळ
- आविष्कार देसाई, अलिबाग
स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट दर्जाची वैयक्तिक शौचालये उभारण्यासाठी जेएसडब्लू इस्पात कंपनी सीएसआर फंडातून १५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ उभे करणार आहे. त्यामुळे दिवेआगर हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे अशी अपेक्षा केली आहे. त्यांच्याच संकल्पनेतून संसद आदर्श ग्राम योजना जन्माला आली आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावात आवश्यक ती सर्व विकासकामे करता येणार आहेत. खासदारांना तेथे विकासकामे करताना विशेष निधीही दिला जाणार आहे.
अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाचा समावेश संसद ग्राम योजनेत केला असून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला दिवेआगरमध्ये एकूण १२२ वैयक्तिक शौचालये उभारायची आहेत. पैकी ३९ शौचालये बांधून पूर्ण झाली असून ८३ शौचालये बांधणे अद्यापही बाकी आहेत. जेएसडब्लू इस्पात कंपनी चांगल्या प्रतीची ६३ शौचालये बांधून देण्यास तयार झाली आहे. यासाठी लागणारा १५ लाख रुपयांचा निधी कंपनी त्यांच्या सीएसआर फंडातून खर्च करणार आहे. याबाबतची बैठक नुकतीच कंपनीमध्ये पार पडली. (वार्ताहर)
८३ स्वच्छतागृहे
अनंत गीते यांनी दिवेआगरमध्ये विकासकामांचे नुकतेच भूमिपूजन केले आहे. त्यांना कंपनीचा सीएसआर फंड विधायक कामासाठी खर्च करण्यात कोणतीच अडचण येणार नसल्याने कंपनीही त्यांना सढळ हस्ते मदत करणार यात शंका घेण्याचे कारण नाही. कंपनीकडून एकूण ८३ स्वच्छतागृहे बांधून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे रायगड समन्वयक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.