Action against drunk driving in Neral | नेरळमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नेरळमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

नेरळ : शहरात तसेच परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली असून बेशिस्त वाहनचालकांना शिस्तीचा डोस दिला जात आहे. महिनाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे ३०० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई
केली असून त्यांच्याकडून सुमारे ९० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे उल्लंघन करणाºया चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी चालकांवर बेधडक करवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. मात्र काही महिन्यांपासून नेरळ शहर व परिसरात ही कारवाई थंडावली होती. पुन्हा या कारवाईला सुरुवात झाली आहे. नाकानाक्यावर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणे, वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, वाहन वेगाने चालवणे, गणवेश न घालणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, ट्रीपल सीट, दारू पिवून गाडी चालवणे अशा प्रकारे वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईतून दंडही वसूल केला जात आहे. परंतु वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, वाहनांवरून फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहन चालकांवर कारवाई होता दिसत नाही. तसेच नेरळ शहरात अनेक रिक्षा स्टँड असून सुमारे ५००हून अधिक रिक्षाचालक आहेत, परंतु मोजके रिक्षाचालक सोडले तर अनेक रिक्षाचालक गणवेश घालत नसल्याचे चित्र आहे.
तसेच नेरळ शहरात ही कारवाई सुरू असली तरी नेरळ बाजारपेठ तसेच नेरळ बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने लावली जात असल्याने प्रवासी व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नेरळ बाजारपेठेत आणि नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहनचालक कशाही रिक्षा लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे आणि त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.
गेल्या महिनाभरात सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक शिओळे, सुभाष पाटील, आशिष कराळ यांनी नेरळ शहरात सुमारे ३०० वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ८६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Web Title:  Action against drunk driving in Neral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.