सहा आसनी रिक्षाला अपघात
By Admin | Updated: November 19, 2015 00:24 IST2015-11-19T00:24:54+5:302015-11-19T00:24:54+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून

सहा आसनी रिक्षाला अपघात
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील जेटीवरून प्रवासी घेऊन बोर्लीकडे निघालेली सहा आसनी रिक्षा दिघी खाडीमध्ये पडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यातील एका महिलेस महाड येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास समुद्रातील ओहोटीमुळे खाडीला पाणी कमी झाल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिघी येथे मुरु ड लाँचने आलेले प्रवासी बोर्लीपंचतन किंवा अन्य मार्गावर झटपट प्रवासासाठी मिनीडोरमधून प्रवासी वाहतूक सुरू असते. मंगळवारी सायंकाळी प्रवाशांना घेऊन टाटा मॅजिक दिघी जेटीवरून बोर्लीपंचतनकडे येण्यास निघाली. जेटीवरून बोर्ली-श्रीवर्धन मुख्य रस्त्यापर्यंत दिघी खाडीलगत भराव टाकून एक कच्चा रस्ता दोन तीन वर्षापूर्वी तयार करण्यात आला आहे. जेटीचे काम सुरू असल्याने मोठे दगड बाहेर आले असून तोे अपूर्णावस्थेत आहे. या रस्त्यानेच वाहनांची वर्दळ असते, ही गाडी जेटीवरून काही मीटर अंतरावर आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला कठडे नसल्याने ही टाटा मॅजिक १५ ते २० फूट खोल खाडीमध्ये पलटी झाली. त्यामुळे गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये चालक युनुस बोदलाजी, प्रमोद पाटील (३६, रा. नाशिक), आलिया दळवी (रा. दिघी), सईद दळवी.(रा. दिघी) हे जखमी झाले तर सीमा पाटील यांना उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)