जिल्ह्यातील ८५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन
By Admin | Updated: April 28, 2017 00:31 IST2017-04-28T00:31:51+5:302017-04-28T00:31:51+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार कुटुंबांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे,

जिल्ह्यातील ८५ हजार कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन
अलिबाग : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ८५ हजार कुटुंबांच्या घरात गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली. गीते यांच्या हस्ते ३० महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. लाभार्थी गॅस कनेक्शन वितरण सोहळा निवडणूक आचारसंहितामुळे लांबला होता. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉल येथे बुधवारी हा कार्यक्र म पार पडला.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी गॅस कनेक्शन वितरण सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय कवळे, अलिबाग तालुका प्रमुख दीपक रानवडे, अलिबाग शहर प्रमुख कमलेश खरवले, संदीप घरत, जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ, कैलास जगे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन आॅईल या गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
रायगड जिल्ह्यात १ मे रोजी योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील ४ लाख व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहेत. सरासरीनुसार एका कुटुंबात ५ सदस्य गृहीत धरले तर ८५ हजार कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यापैकी १५ हजार ३९५ कुटुंबांना या योजनेचा लाभ रायगड जिल्ह्यात देण्यात आला आहे, असे ही अनंत गीते यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील जनतेने गॅस सबसिडी सोडल्याने ते पैसे सरकारच्या खात्यात जमा होत आहेत. त्यातूनच उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येत आहे. चुलीच्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे अनेक आजार होत आहेत. या गरीब महिलांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी गॅस कनेक्शन दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला. (प्रतिनिधी)