बँकॉकमध्ये ५० गणेशमूर्ती रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:58 IST2019-03-13T22:57:57+5:302019-03-13T22:58:18+5:30
यंदा पेणमधील गणेशमूर्तींची परदेशस्थ अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

बँकॉकमध्ये ५० गणेशमूर्ती रवाना
- दत्ता म्हात्रे
पेण : यंदा पेणमधील गणेशमूर्तींची परदेशस्थ अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. २०१९ वर्षात उत्सवाच्या अनुषंगाने सहा महिनेअगोदरच अॅडव्हान्स बुकिंग म्हणून पेणच्या कार्यशाळांमध्ये बाप्पांच्या सुबक मूर्तींची मागणी करण्यात आली आहे. मॉरिशसपाठोपाठ आता बँकॉकमध्ये दहा फूट उंच १५ मोठ्या गणेशमूर्ती, तर दीड ते दोन फूट उंचीच्या ३५ अशा एकूण ५० गणेशमूर्ती पेण शहरातून रवाना झाल्या असल्याची माहिती मूर्तिकार दीपक समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या वर्षीचा बाप्पाचा गणेशोत्सव जरा हटके करण्याची परदेशस्थ अनिवासी भारतीयांची चढोओढ सुरू असून, मॉरिशस देशापाठोपाठ दुसरी मोठी आॅर्डर बँकॉकमध्ये झाली आहे. मार्च महिन्यातच या दोन आॅर्डर पूर्ण झाल्यामुळे कार्यशाळांमध्ये उत्साही वातावरण आहे. साधारणपणे बाप्पाची परदेशवारी ही एप्रिल अखेरीस सुरू होते ती थेट जून महिन्याच्या अंतापर्यंत. मूर्तिकार परदेशातील मागण्याच्या अनुषंगाने तयारीत असतात. मात्र, यावर्षी २०१९ च्या वर्षारंभी या आॅर्डर मिळाल्याने त्यांची पूर्तता यशस्वीपणे करण्यासाठी चित्रशाळांमधील कामगारांना भरपूर वेळ मिळाला आहे. अतिशय आकर्षक व देखण्या गणेशमूर्ती विविध कला केंद्रांत साकारल्या जात असून, बॉक्स पॅकिंगसह कंटेनर पॅकिं गसह त्या बँकॉक देशात रवाना केल्या आहेत.
या दहा फूट उंचीच्या गणेशमूर्तींना रंगसंगतीमध्ये आकर्षक रंगांनी सजविल्या असून, त्यांच्या डोळ्यांची आखणी बॉडीकलर यासाठी विशेष रंगाचा वापर करण्यात आला असून, अधिक काळ टिकतील याची दक्षता घेतली असल्याचे गणेशमूर्तिकार नीलेश समेळ यांनी सांगितले.