पाणीपुरवठ्याच्या ४८० योजना
By Admin | Updated: November 17, 2015 00:34 IST2015-11-17T00:34:45+5:302015-11-17T00:34:45+5:30
रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

पाणीपुरवठ्याच्या ४८० योजना
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद यासाठी सुमारे ८० कोटी रूपर्य खर्च करणार असून जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील लघु प्रकल्पाची २८ धरणे दुथडी भरून वाहतात. एवढ्या संख्येने पाऊस पडूनही त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने सप्टेंबरपासूनच पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो.
जिल्हा प्रशासन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार करते. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. हा तात्पुरता उपाय असल्याने नागरिकांना
दरवर्षी पाणी समस्येला सामोर जावे लागते.
४८० पाणीपुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेने हाती घेतल्या आहेत. या योजना जुन्याच असून त्या प्रथम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनांसाठी सुमारे ८० कोटी रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता टोरो यांनी लोकमतशी बोलताना दिली. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पाण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्यानेही काही योजना हाती घ्यायच्या असल्या तरी आधी जुन्या योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)