म्हसळा तालुक्यात ४६६ दाखलपात्र विद्यार्थी
By Admin | Updated: April 25, 2017 01:13 IST2017-04-25T01:13:58+5:302017-04-25T01:13:58+5:30
सर्व शिक्षा अभियानअंतर्गत म्हसळा तालुक्यातील ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दाखलपात्र

म्हसळा तालुक्यात ४६६ दाखलपात्र विद्यार्थी
म्हसळा : सर्व शिक्षा अभियानअंतर्गत म्हसळा तालुक्यातील ६ ते १४ वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचा सर्व्हे झाला. त्यामध्ये एकूण ४६६ दाखलपात्र विद्यार्थी आढळून आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४, १५ एप्रिल रोजी तालुक्यातील ३२८ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी शाळेत दाखल केले आहे. शिल्लक राहिलेली मुलेही लवकरच शाळेत दाखल होतील, असा विश्वास म्हसळा प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
म्हसळा तालुक्यात ८४ महसुली गावांपैकी तालुका शहर नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक सेवा सुविधा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ११० प्राथमिक शाळा आहेत, याकरिता ११ केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रनिहाय दाखलपात्र ४६६ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. यापैकी १४ व १५ एप्रिल रोजी ३२८ विद्यार्थी दाखल झाल्याचे गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी सांगितले. तसेच ४ मुले व २ मुलींना दाखलपात्र व्यतिरिक्त जादा दाखल अशी नोंद करण्यात आली आहे. दाखलपात्र विद्यार्थी संख्येत उन्हाळी सुटीनंतर वाढ होईल, असा विश्वास गट शिक्षण अधिकारी साळुंखे यांनी व्यक्त के ला. जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू शाळांमध्ये आता दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचे सांगून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांत दाखल करण्याचे आवाहन साळुंखे यांनी केले. दाखलपात्र विद्यार्थी नोंद ही तालुक्यात कार्यरत ९७ अंगणवाडी आणि ३१ मिनी अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींची आहे. (वार्ताहर)