किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा
By Admin | Updated: May 26, 2016 03:10 IST2016-05-26T03:10:26+5:302016-05-26T03:10:26+5:30
हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन अशी ओळख असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रभ

किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा
महाड : हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्यदिन अशी ओळख असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन सोहळा ६ जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे एक लाखापेक्षा अधिक शिवभक्त हजेरी लावणार असल्याची माहिती या सोहळ्याचे संयोजक अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष रघुवीर देशमुख, प्रशांत दरेकर, वैभव शेडगे उपस्थित होते.
युवराज संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त ५ व ६ जून रोजी रायगडावर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टतर्फे याप्रसंगी गडावरील सर्व प्रेक्षणीय स्थळांची फुलांनी सजावट केली जाणार असून ६ जूनला छत्रपतींच्या पालखी मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती दिली. गतवर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या दिवशी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर झालेला वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेवून स्वत: संयोजन समितीचे विशेष नियोजन केले आहे. गडावर ५ जूनला गडपूजन, युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह, शिरकाईदेवी व तुळजामातेचा गोंधळ विधी कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. (वार्ताहर)
भव्य मिरवणूक
दुसऱ्या दिवशी ६ जूनला पहाटे ५.३० वा. पासून अभिषेक पूजा, शाहिरी मुजऱ्याने सुरुवात होणार आहे. स. ९.३० वा. युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर राजघराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रघोषात अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.