कर्जतमध्ये २४ गावे, ६२ वाड्या तहानलेल्या
By Admin | Updated: April 22, 2017 02:50 IST2017-04-22T02:50:26+5:302017-04-22T02:50:26+5:30
तालुक्यात २०१६ मध्ये चांगला पाऊस झाला असूनही अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येत अडकला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यात

कर्जतमध्ये २४ गावे, ६२ वाड्या तहानलेल्या
कर्जत : तालुक्यात २०१६ मध्ये चांगला पाऊस झाला असूनही अर्धा तालुका पाणीटंचाईच्या समस्येत अडकला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यात तालुक्यातील तब्बल १३७ गावे-वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील २४ गावांना आणि ६२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन संभाव्य कृती आराखड्यात आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून अनेक ठिकाणी पाणीटंचाईने आदिवासी हैराण असताना सरकार टँकर सुरू करण्याबाबत उदासीन आहे.
कर्जत तालुक्याची रचना लक्षात घेता तालुक्यातील पाण्याची स्थिती विषम असल्याचे दिसून येत आहे. राजनाला कालव्याचे पावसाळा वगळता अन्य आठ महिने वाहते असलेले पाणी, पाझर तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प असे सर्व काही असताना आज अर्धा तालुका पाणीटंचाईग्रस्त आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक आमदारांंच्या अध्यक्षतेखाली तालुक्याच्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी तालुक्याचा आढावा घेऊन पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यातील डिसेंबर २०१६ मधील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांंची यादी तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणेला आणि लोकप्रतिनिधी यांना विचार करायला लावणारी आहे. आजही ५६ गावे, ८१ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात मार्च २०१७ पासून मागणीनुसार टँकर सुरू करावा लागेल अशा गावांची आणि वाड्यांची यादी ८६ इतकी मोठी आहे. अन्य ५१ गावे-वाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी विंधण विहिरींची मात्रा लागू करण्याचा पर्याय पाणीटंचाई कृती आराखड्यात ठेवला आहे.
पाणीटंचाईग्रस्त गावे
पाणीटंचाईग्रस्त वाड्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील वाड्यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील आतापर्र्यंत संभाव्य पाणीटंचाईग्रस्त
गावे-वाड्यांची २०१७ मधील यादी ही सर्वाधिक भीषणता दाखविणारी आहे. पाषाणे, खडकवाडी, खानंद, माणगाव, अंभेरपाडा, ओलमण, सावरगाव, वारे, मानकिवली, पोही, कुरु ंग, खाड्याचापाडा, आर्ढे, आसे, पिंपळोली, तळवडे, अंथराट, कडाव, चांधई, बीड, नेवाळी वाकस आदी गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणीटंचाईग्रस्त वाड्या
आनंदवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, बेलाचीवाडी, काठेवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, गोरेवाडी, ताडवाडी, मोरेवाडी, पाली धनगरवाडा, सागाचीवाडी, भुतीवलीवाडी, आसलवाडी, धामणदांड, कळंब बोरीचीवाडी, चिंचवाडी, मिरचुलवाडी, तळवडे बुद्रुक, काळेवाडी, आषाणेवाडी, झेंडेवाडी, धारेवाडी, सुतारवाडी, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, हऱ्याचीवाडी, विकासवाडी, खैरपाडा, कुरकुरवाडी, गोंधळवाडी, बोरवाडी, चई, झुगरेवाडी, तळ्याचीवाडी, कडाव बौद्धवाडी आदी वाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना भर उन्हात धावपळ करावी लागत आहे.