ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:19 AM2021-01-12T00:19:11+5:302021-01-12T00:19:28+5:30

सत्पाळा व पालीत चुरशीची शक्यता

21 women candidates in Gram Panchayat election arena | ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात २१ महिला उमेदवार

Next

सुनील घरत
लोकमत न्यूज नेटवर्क 
पारोळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायतींच्या सत्तेतही आता महिलांना ५० टक्के वाटा मिळालेला असून, अनेक ग्रामपंचायतींचा कारभार महिला सांभाळताना दिसत आहेत. वसई तालुक्यातील सत्पाळा आणि पाली या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीनंतरही तेथे महिलाराज येणार हे आधीच स्पष्ट झालेले असून, निवडणुकीची पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून महिला उमेदवारही ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच महिला आरक्षण होते, पण आता या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षणाची सोडत होणार असल्याचे पुन्हा महिलाराज येईल का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने, सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत.

सत्तेतील वाट्यामुळे महिला उमेदवारांना महत्त्व
अलीकडच्या काळात  ग्रामपंचायतींच्या सत्तेत महिलांनाही समान वाटा दिल्याने महिला उमेदवारांना मोठे महत्त्व आले आहे. अनेकदा सत्तेच्या चाव्याही महिला उमेदवारांकडे असतात. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात महिलांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विधानसभासभा निवडणुकीनंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे या वर्षभरात कोणतीही निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे वर्षभरातील ही ग्रामपंचायत निवडणूक पहिलीच आहे.

राजकीय पक्षांमध्ये जिंकण्यासाठी चुरस 
वसई तालुक्यात होत असलेल्या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे, तर राजकीय पक्षांना ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. यामध्ये निवडून आलेल्या महिला उमेदवारांना मोठे महत्त्व येणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विजयाची लाॅटरी कुणाला लागणार ?
कोरोनाच्या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायती असून, पालघर तालुक्यातील सांगावे व वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसईतील दोन ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आता २१ महिला रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी कुणाकुणाला विजयाची लाॅटरी लागते याविषयी नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Web Title: 21 women candidates in Gram Panchayat election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.