२ मंत्र्यांसह १५ आमदारांचा फैसला

By Admin | Updated: October 15, 2014 04:47 IST2014-10-15T00:21:16+5:302014-10-15T04:47:16+5:30

एरव्ही, आघाडी आणि युती असताना संयुक्तरित्या लढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजपचे उमेदवार यंदा पंधरा वर्षांनंतर एकमेकांना आव्हान देऊन लढत आहेत

15 decision of 15 MLAs including ministers | २ मंत्र्यांसह १५ आमदारांचा फैसला

२ मंत्र्यांसह १५ आमदारांचा फैसला

जितेंद्र कालेकर, ठाणे
जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमध्ये २३८ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यात पालकमंत्री गणेश नाईक, वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १५ विद्यमान आमदारांचे भवितव्य बुधवारी होणा-या मतदानाद्वारे यंत्रात बंदिस्त होणार आहेत.
एरव्ही, आघाडी आणि युती असताना संयुक्तरित्या लढणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना भाजपचे उमेदवार यंदा पंधरा वर्षांनंतर एकमेकांना आव्हान देऊन लढत आहेत. त्यांना मनसेनेही आव्हान दिल्यामुळे आमदारांसह मंत्र्यांनाही ही निवडणूक कसोटीची वाटत आहे. बेलापूरमधून नाईकांना माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपातून तर विजय नाहटा यांनी शिवसेनेतून आव्हान दिले आहे. कळवा-मुंब्य्रातून आव्हाडांना शिवसेनेचे उपनेते दशरथ पाटील, काँग्रेसचे यासीन कुरेशी आणि एमआयएमचे अशरफ मुलाणी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मंत्र्यांची जागा पुन्हा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने तर आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेनेही पाटलांच्या प्रचारातून रणनीती केली आहे. त्यात मागचा वचपा काढण्यासाठी राजन किणे यांच्यासह काँग्रेसने या ठिकाणी जोर लावला आहे. नाईकांवर घराणेशाहीचा आरोप होतोय, तर आव्हाडांच्या मुकाबल्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला.

कोपरी-पाचपाखाडी
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांची भाजपाचे संदीप लेले, राष्ट्रवादीचे डॉ. बिपिन महाले, काँग्रेसचे मोहन तिवारी आणि मनसेच्या सेजल कदम यांच्याशी लढत आहे. पुन्हा ही जागा राखण्यासाठी शिवसेनेने जीवाचे रान केले आहे.
ओवळा-माजिवडा
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना मनसेचे सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे, काँग्रेसच्या प्रभात पाटील आणि भाजपाचे संजय पांडे यांचा सामना करावा लागणार आहे. आपली जागा पुन्हा राखण्यासाठी सरनाईकांसह शिवसैनिकांनी मेहनत घेतली आहे. तर ऐनवेळी पक्षात आलेल्या भाजपाच्या पांडेंची भिस्त मोदींच्या लाटेवर आहे.
ठाणे शहर
विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरविले आहे. त्यांचा शिवसेनेचे रवींद्र फाटक, भाजपाचे माजी आमदार संजय केळकर, काँग्रेसचे नारायण पवार आणि मनसेचे शहरप्रमुख निलेश चव्हाण यांच्याशी सामना आहे. आपला गड राखण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली आहे. राष्ट्रवादीने डावखरेंसाठी तर भाजपाने पूर्वीचा भाजपाचा गड राखण्यासाठी ठाण्याची जागा प्रतिष्ठेची केली आहे.
मीरा-भार्इंदर
राष्ट्रवादीचे आमदार गिल्बर्ट मेंडोन्साची लढत भाजपाच्या नरेंद्र मेहतांसह शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे, बसपाचे शेख इस्लाम अहमद आणि काँग्रेसचे याकुब कुरेशी यांच्याशी होणार आहे. परंतू गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे भाजपाचे मेहता आणि मेंडोन्सा यांच्यातच खरी लढत येथे आहे.
ऐरोली
आमदार आणि पालकमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचा मुख्य सामना नाईकांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि शिवसेना नवी मुंबई प्रमुख विजय चौगुले आणि चुलत भाऊ असूनही शिवसेनामार्गे भाजपात आलेले वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. याशिवाय, काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे आणि मनसेचे गजानन खबले हेही रिंगणात आहेत.
अंबरनाथ
शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांची मुख्य लढत गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांच्याशी होणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसचे कमलाकर सूर्यवंशी, भाजपाचे राजेश वानखेडे आणि मनसेच्या विकास कांबळे यांच्याशी त्यांची लढत आहे.
उल्हासनगर
भाजपानेही आमदार कुमार आयलानी यांनाच उमेदवारी दिली. त्यांची शिवसेनेच्या धनंजय बोडारे, राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी (माजी आमदार पप्पू कलानींच्या पत्नी), मनसेचे सचिन कदम, काँग्रेसचे प्रकाश कुकरेजा यांच्याशी लढत होईल.
कल्याण पश्चिम
मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांची लढत शिवसेनेच्या विजय साळवींसह काँग्रेसचे सचिन पोटे, राष्ट्रवादीचे संजय पाटील आणि भाजपाचे नरेंद्र पवार यांच्याशी होणार आहे. त्यांनी गेल्या वेळी शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकरांचा पराभव केला होता. कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर वैजयंती घोलप यांच्यासह १० इच्छुक असल्यामुळे तिथे विजय साळवींना उमेदवारी देण्यात आली.
भिवंडी पूर्व
शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासमोर माजी आमदार समाजवादी पार्टीचे फरहान आझमी यांच्यासह काँग्रेसचे मोहंमद फजिला अन्सारी, राष्ट्रवादीचे खलीद शेख आणि स्थायी समितीचे माजी सभापती, भाजपाच्या संतोष शेट्टी यांच्यात लढत रंगणार आहे. या वेळी पुन्हा पराभूत फरहान सपातून उभे आहेत. त्यामुळे गमावलेली जागा पुन्हा काबीज करण्यासाठी आझमी पिता-पुत्रांनी आणि पोटनिवडणुकीत मिळालेली जागा राखण्यासाठी शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.
भिवंडी पश्चिम
आमदार अब्दुल रशीद मो. ताहीर मोमीन हे राष्ट्रवादीतून रिंगणात आहेत. गेल्या वेळी त्यांनी सपातून निवडणूक जिंकली होती. गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झालेले साईनाथ भाजपामार्गे शिवसेनेत आले. पण, तिथे ज्येष्ठ नगरसेवक काटेकरांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे ताहीर मोमीन यांची शिवसेनेचे मनोज काटेकर, काँग्रेसचे शोएब खान, राष्ट्रवादीचे अब्दुल ताहीर भाजपाचे महेश चौगुले आणि समाजवादीच्या अब्दुल अन्सारी यांच्याशी लढत आहे.
डोंबिवली
आमदार रवींद्र चव्हाण यांनाही भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. २००९ मध्ये मनसेच्या राजेश कदमांना पराभूत करणाऱ्या चव्हाणांना या वेळी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, मनसेच्या हरिश्चंद्र पाटील, राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे आणि काँग्रेसचे संतोष केणे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. कडोंमपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपासून आमदारकी गाठणारे चव्हाण या वेळी पुन्हा विजयी होणार की तिथे आणखी कोणी बाजी मारणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
कल्याण ग्रामीण
आमदार रमेश पाटलांनाच मनसेने तिकीट दिले आहे. त्यांचा राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत आलेल्या माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह राष्ट्रवादीच्या वंडार पाटील, काँग्रेसच्या शारदा पाटील, बसपाच्या भारती पगारे यांच्याशी सामना होणार आहे. शिवसेनेने या ठिकाणी गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झालेल्या रमेश म्हात्रेंऐवजी भोईरांना उमेदवारी बहाल केल्यामुळे त्यांनी भाजपातून तिकीट मिळविले होते. मात्र, बढती देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात मातोश्रीला यश आले. त्यामुळे म्हात्रेंनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे भाजपाला तिथे उमेदवार उभा करता आलेला नाही.
कल्याण पूर्व
विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. वसंत डावखरे समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात. राष्ट्रवादीतून तिकीट मिळविण्याऐवजी ते अपक्ष असून त्यांची लढत राष्ट्रवादीचे निलेश शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपाचे विशाल पावशे आणि मनसेच्या नितीन निकम यांच्याशी होणार आहे. थेट जिल्हाप्रमुख रिंगणात असल्यामुळे राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेनेही ही जागा प्रतिष्ठेची केली.
शहापूर
शिवसेनेचे आमदार दौलत दरोडा यांची काँग्रेसचे पद्माकर केवारी, राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा, भाजपाचे अशोक ईरनक आणि मनसेच्या ज्ञानेश्वर तळपडे यांच्याशी लढत आहे. तीन वेळा निवडून आलेले दरोडा हे २००४ मध्ये म.ना. बरोरा यांच्याकडून पराभूत झाले होते. आता बरोरांचे चिरंजीव पांडुरंग बरोरा यांनी दरोडांना आव्हान दिले आहे. दरोडा आपली जागा राखतात की बरोरा पुन्हा आपल्या वडिलांप्रमाणेच दरोडांशी सामना करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुरबाड
आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपातून उमेदवारी मिळविली आहे. त्यांची काँग्रेसचे राजेश घोलप, राष्ट्रवादीचे गोटीराम पवार, शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्याशी लढत आहे.

Web Title: 15 decision of 15 MLAs including ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.