महासंघाचे २१ पैकी १४ उमेदवार बिनविरोध
By Admin | Updated: April 29, 2017 01:51 IST2017-04-29T01:51:48+5:302017-04-29T01:51:48+5:30
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे

महासंघाचे २१ पैकी १४ उमेदवार बिनविरोध
अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीतील एकू ण २१ जागांकरिता उभ्या केलेल्या गिरीश तुळपुळे गटाच्या उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी अपात्र ठरवले होते. त्यावर तुळपुळे गटाने जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडक यांच्याकडे अपिल केले असता, त्यांनीही अर्ज अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. जिल्हा उप निबंधकांच्या निर्णयास तुळपुळे गटाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, उच्च न्यायालयानही मूळ अर्ज अपात्रतेच्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परिणामी, २१ जागांकरिता उभ्या असलेल्या प्रा. डॉ. उदय जोशी गटाचे १३ व अन्य एक अशा १४ पात्र उमेदवारांची निवड बिनविरोध झाली आहे.
महासंघाच्या उर्वरित ७ जागांपैकी ३ जागा रिक्त राहिल्या असून, अन्य चार जागांकरिता ८ मे २०१७ रोजी मतदान होणार असून त्यानंतर औपचारिक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी हे करतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ एप्रिल २०१७ पर्यंत होती. उमेदवारी घेण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ६ मतदार संघातील १४ जागांकरिता १४ उमेदवारच पात्र असल्यामुळे या सर्व १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या १४ उमेदवारांपैकी १३ उमेदवार प्रा. डॉ. उदय जोशी यांच्या पॅनेलचे असून, या १३ उमेदवारांमध्ये अॅड. जे. टी. पाटील (अलिबाग), अॅड. सागर पाटील (अलिबाग), अॅड. संतोष पवार (अलिबाग), अॅड. के. एस. पाटील (पनवेल), हेमंत पाटील (उरण), प्रकाश चांदिवडे (कळंबोली), दिलीप पटेल (रेवदंडा), चंद्रकांत घोसाळकर (पाली), दिलीप जोशी (मुरुड), जगदीश कवळे (अलिबाग), योगेश मगर (वेश्वी-अलिबाग), श्यामकांत भोकरे (बोर्लीपंचतन-श्रीवर्धन) व निजामुद्दीन कागदी (साई-माणगाव) यांचा समावेश आहे. चौदावे गणेश म्हात्रे (चिरनेर-उरण) हेसुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.
महासंघाच्या ज्या ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे, त्यामध्ये प्रा. डॉ. उदय जोशी पॅनलचे महिला राखीवकरिता कविता प्रवीण ठाकूर (अलिबाग) व उषा लक्ष्मण चांदगावकर (रोहा) तर अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेकरिता संजय बाबूराव वानखेडे (पिंपळभाट-अलिबाग) व विशेष मागास प्रवर्गातून नरसिंह बाळकृष्ण मानाजी हे निवडणूक लढवित आहेत.
(विशेष प्रतिनिधी)