फणसकोंड जंगलात १२ सशस्त्र शिकाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:22 IST2019-02-21T04:22:30+5:302019-02-21T04:22:46+5:30
पोलादपूरमधील प्रकार : दोन दिवसांची पोलीस कोठडी

फणसकोंड जंगलात १२ सशस्त्र शिकाऱ्यांना अटक
अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड गावालगतच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या १२ शिकाºयांना विविध शस्त्रासह मंगळवारी भरदुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ अटक करण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या शिकाºयांकडून २ बंदुका, ५ जिवंत काडतुसे, कोयते, बेचक्या अशी शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
या १२ शिकाºयांना न्यायालयासमोर हजर केले असता, गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलादपूर तालुक्यातील या १२ शिकाºयांमध्ये सायबू शिवराम पवार (४५,रा. बाजीरे-कापडेबुद्रुक), मारूती तुकाराम पवार (५२,रा.गाडीतळ-पोलादपूर), वामन सीताराम पवार (३५ रा. भोगाव खुर्द), सुरेश लक्ष्मण मुकणे (३२, रा. गाडीतळ पोलादपूर), काशिनाथ तुकाराम पवार (५५,रा.गाडीतळ पोलादपूर), दिलीप चिल्या पवार (२२, रा. भोगाव खुर्द), नीलेश यशवंत जाधव (२१,रा. भोगाव खुर्द), रमेश काळूराम पवार (२१, रा. भोगाव खुर्द), नितीन काळुराम पवार (२४, रा. भोगाव खुर्द), भोलेनाथ बळीराम पवार (२५,रा. भोगाव खुर्द), संजय काळूराम निकम (२५,रा. भोगाव खुर्द) आणि संतोष मोतीराम पवार (२५,रा. गाडीतळ पोलादपूर) यांचा समावेश आहे. या १२ जणांविरूध्द भारतीय हत्यार कायदा १९५९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी फणसकोंड या गावाच्या हद्दीतील जंगल भागात नदीवर पाणी पिण्याकरिता येणाºया प्राण्यांची शिकार करण्याकरिता हे १२ शिकारी विनापरवाना दोन बंदुका, २ कोयते, ५ काडतुसे, तीन बेचक्यासह दोन मोटारसायकलीने येवून दबा धरुन बसले होते. पोलीस कॉन्स्टेबल इकबाल चाँदखा शेख यांना प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी १२ शिकारी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
वन्यजीवांची तस्करी
च्जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जंगल भागात शिकारी राजरोस वावरत असतात तर मांडूळ, खवले मांजर आदी अतिसंरक्षित प्रजातीतील वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात तस्करी आणि सापांच्या विषाची तस्करी असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.
च्पाली व अलिबागमधील मांडूळ तस्करी, श्रीवर्धनमधील खवल्या मांजराची तस्करी, सापाच्या विषाची तस्करी, खैराच्या झाडाची बेकायदा तोड या सर्व जंगल आणि वन्यप्राण्याशी निगडित गुन्ह्यामध्ये रायगड पोलिसांनी सातत्याने कारवाई केली आहे आणि त्याच वेळी ज्यांची जबाबदारी आहे तो वन विभाग मात्र प्रत्येक वेळी अनभिज्ञ असल्याचे सिद्ध झाले असल्याने, रायगडमधील वन विभागाच्या कार्यप्रणालीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वन्यप्राणी तस्करी, बेकायदा शिकार, बेकायदा शस्त्र याबाबत आम्हाला ज्या-ज्या वेळी माहिती मिळाली आहे, त्यात्यावेळी आतापर्यंत सत्वर कारवाई केली आहे.
- अनिल पारसकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक
आवश्यक गुप्त बातमीदार वन विभागाकडे नसल्याने ते कारवाई करण्यात अपुरे पडतात. जिल्ह्यातील वन्यप्राणी अभ्यासक, जंगलप्रेमी, सर्पमित्र, निसर्गप्रेमी गिर्यारोहक यांच्या सहयोगाने वनविभाग व पोलीस अशी संयुक्त यंत्रणा उभी केल्यास या प्रकारांना निश्चित आळा बसू शकेल.
- डॉ. वैभव देशमुख,
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक व सर्प तज्ज्ञ