आठ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात
By Admin | Updated: January 10, 2016 00:18 IST2016-01-10T00:18:04+5:302016-01-10T00:18:04+5:30
संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक असलेल्या दी अण्णासाहेब सावंत का-आॅप. अर्बन बँकेची बिनविरोध निवडणुकीची गेल्या २० वर्षांची परंपरा यावेळी खंडित झाली

आठ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात
महाड : संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक असलेल्या दी अण्णासाहेब सावंत का-आॅप. अर्बन बँकेची बिनविरोध निवडणुकीची गेल्या २० वर्षांची परंपरा यावेळी खंडित झाली असून, रविवारी १० जानेवारीला आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ पैकी ८ सावंत पॅनलचे सात उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून, आजची निवडणूक ही केवळ औपचारिक असल्याचे बोलले जात आहे.
दोन विरोधकांनी उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने निवडणुकीची प्रक्रिया पार करावी लागत आहे. सहकार महर्षी अण्णासाहेब सावंत पॅनलेचे विद्यमान चेअरमन शोभा सावंत यांच्यासह रमेश वैष्णव, महमदअली पलणकर, मानसी मराठे, प्रभाकर वाडकर, नरेंद्र महाडीक, इंद्रकुमार परमार हे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, सर्वसाधारण (महाड) मतदारसंघातून शहाजी देशमुख, चंद्रहास मिरगल, महेंद्र पाटेकर, प्रवीण पटेल, समीर सावंत, नीता शेठ, सुहास तलाठी, नीलिमा वर्तक या सावंत पॅनलच्या उमेदवारांसह उद्योजक अविकुमार धुरी आणि शेखर ताडकवे, असे दहा जण रिंगणात आहेत. महाड तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सुमारे १८ हजार सभासद मतदार आहेत.
दोन विरोधक उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे तब्बल २० वर्षांची बिनविरोध निवडणुकांची या बँकेची परंपरा खंडित झाली असून, २० वर्षांनंतर प्रथमच सभासदांना मतदानाची संधी मिळणार आहे. या निवडणुकीत विरोधकांचे कुठलेही आव्हान नसल्याने निवडणूक सावंत पॅनलच्या उमेदवारांना अत्यंत सोपी झाली आहे. (वार्ताहर)