शिरूर : शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका यंदा कमालीच्या चुरशीच्या ठरल्या आहेत. या रणसंग्रामात तीन माजी व १ आजी अशा ४ आमदारांच्या कुटुंबातील सदस्य थेट निवडणूक रिंगणात उतरल्याने या लढतींना प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रस्थापित शिरूर राजकीय घराणी आपले वर्चस्व कायम राखणार की नव्या समीकरणांतून नवे नेतृत्व पुढे येणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशातच यंदा वाढता मतदानाचा टक्का कोणाला तारक ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर तालुक्यात यंदा मात्र भाजपने आक्रमक प्रचार करीत राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अनेक दिग्ग्जांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. इतर गटांमध्येही निवडणूक तितकीच रंगतदार ठरली आहे. अनेक गण व गटांमध्ये थेट किंवा चौरंगी लढती झाल्या असून प्रत्येक गटात प्रतिष्ठेचे राजकारण दिसून आले. मात्र, एकूणच नेत्यांच्या घरातील उमेदवारांमुळे यंदाची जिल्हा परिषद निवडणूक शिरूर तालुक्यात चुरशीची व निर्णायक होत आहे, हे मात्र निश्चित आहे.
माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार या वडगाव रासई - मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या निवडणुकीत सुजाता पवार यांच्या माध्यमातून राजकीय कमबॅक करण्यासाठी अशोक पवार यांनी जोरदार रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे सचिन शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले स्वाभिमानी विकास आघाडीचे दादासाहेब फराटे अशी चौरंगी लढत झाली आहे. माजी आमदार (स्व) बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे या भाजपच्या वतीने शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या वृषाली बबन वाळके यांचे आव्हान आहे. बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या निवडणुकीत सहानुभूतीचा लाभ मालती पाचर्णे यांना होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लढतीमुळे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबूराव पाचर्णे, शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
माजी आमदार पोपटराव गावडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठतेची केली आहे. त्यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक ऐनवेळी उमेदवारी कापल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेली सहा दशके गावडे यांचा हा गड मानला जातो. मात्र, यंदा येथे चौरंगी लढत होत असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दामूअण्णा घोडे, शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब डांगे, शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पोकळे अशी तगडी लढत रंगली आहे. पुत्र राजेंद्र गावडे यांचा या लढतीत कस लागला आहे. टाकळी हाजी गटात गावडे कुटुंबीयाची आरपारची लढाई होत आहे.
दरम्यान पुण्यातील आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या दीपाली गव्हाणे या भाजपकडून तळेगाव – रांजणगाव सांडस या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या रेखा बांदल, शिवसेना शिंदे गटाच्या सारिका कर्पे व अपक्ष रेशमा शिंदे यांचे कडवे आव्हान आहे. काल झालेल्या मतदान प्रक्रियेत यंदा तालुक्यात ७६ टक्के मतदान झालेले आहे. यात सर्वाधिक विक्रमी मतदान रांजणगाव सांडस गणात सर्वाधिक ८२.०७ टक्के इतके झाले. त्या खालोखाल रांजणगाव गणपती गणात ८१.३७ टक्के, टाकळी हाजी गणात ८०. ७३ तर कारेगाव गणात ८०.२५ टक्के इतके मतदान झाले आहे. सर्वात कमी ७०.६६ टक्के मतदान शिक्रापुर गांनात झाले आहे. यंदा झालेल्या चुरशीच्या लढती, मोठ्या प्रमाणात झालेले लक्ष्मी दर्शन यामुळे हे मतदान वाढले आहे, ते कोणाला तारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Shirur ZP elections see intense family battles of ex-MLAs. High voter turnout sparks speculation on who benefits. BJP challenges NCP stronghold.
Web Summary : शिरूर ZP चुनाव में पूर्व विधायकों के परिवार की ज़ोरदार टक्कर। उच्च मतदान से अटकलें तेज़, किसे होगा फायदा? बीजेपी ने एनसीपी के गढ़ को चुनौती दी।