रोस्टरअभावी जिल्हा परिषद शाळांत ५५0 शिक्षक कमी
By Admin | Updated: October 28, 2015 01:14 IST2015-10-28T01:14:40+5:302015-10-28T01:14:40+5:30
‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ५५0 शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे

रोस्टरअभावी जिल्हा परिषद शाळांत ५५0 शिक्षक कमी
पुणे : ‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड आता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ५५0 शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे. बिंदुनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे, राज्यातील केवळ चार जिल्हा परिषदांचे रोस्टर
पूर्ण झाले आहे. गेली अडीच वर्षे जिल्ह्यात रोस्टरचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २0११ पर्यंतचे रोस्टर तपासून घेतले होते. सहायक आयुक्त मागासवर्ग कक्षाने सुरुवातीला १९९९
पर्यंत माहिती मागविली. त्यानंतर आता १९८६ पासूनची माहिती मागविली आहे.
जिल्हा परिषद स्थापनेपूर्वीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने तेव्हाची माहिती देणार कशी, असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे
निर्माण झाला आहे. रोस्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन तसेच भरती करता येत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात शिक्षकांचा मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात ५५0 शिक्षक कमी आहेत.
यात मुळशी तालुक्यात ७0, वेल्हे तालुक्यात ७२, भोर ४२ व हवेली तालुक्यात १७ व इतर तालुक्यांत मिळून ५५0 शिक्षक कमी आहेत. ज्या ठिकाणी एक किंवा दोनशिक्षकी शाळा आहेत, तेथील शिक्षक रजेवर गेल्यावर शाळा बंद ठेवल्या जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
ग्रामस्थ शिक्षकांची मागणी करीत आहेत. आंदोलनेही करीत आहेत. मात्र, रास्टर मान्यतेअभावी आमचे हात बांधले असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी तरी रास्टरला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांच्या रोषाला जिल्हा
परिषद प्रशासनाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी असे ४५0 शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत.
हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोस्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थ्यांनी वारंवार मागणी करून समायोजन न केल्याने अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या विरोधात अवमान याचिकाही दाखल
केली आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी २0१२ पासून
प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांनी आम्ही किती दिवस थांबायचे? आता तरी आम्हाला सामावून घ्या, अशी निर्वाणीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)