जिल्हा परिषदेचा कारभार कासव गतीने
By Admin | Updated: December 24, 2015 00:48 IST2015-12-24T00:48:23+5:302015-12-24T00:48:23+5:30
अर्थसंकल्प सादर करून नऊ महिने उलटले, तरी फक्त २५ टक्केच निधी खर्च झाल्याने बुधवारी स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले

जिल्हा परिषदेचा कारभार कासव गतीने
पुणे : अर्थसंकल्प सादर करून नऊ महिने उलटले, तरी फक्त २५ टक्केच निधी खर्च झाल्याने बुधवारी स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पुढील महिन्यात या वर्षातील ‘बॅकलॉग’ भरून काढा, वेळ पडल्यास रात्री उशिरा थांबून कामे करा, असे सक्त आदेशच त्यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेने २०१५-१६
चा १७८ कोटी ५० लाखांचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर पुरवणी अर्थसंकल्प ४५ कोटी ७५ लाखांचा मिळून २२४ कोटी २५ लाखांचे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक मांडले होते. याला साधारण नऊ महिने उलटले, मात्र कामे होत नसल्याच्या तक्रार येत आहेत.
अजून पीठगिरणी नाहीत, सायकली मिळाल्या नाहीत, वैयक्तिक लाभाच्या वस्तूंचे वाटप नाही, अशा लोकांच्या तक्रारी येत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेकडे करीत आहेत.
बुधवारी स्थायी समितीत २०१४-१५ व २०१५-१६ च्या कामांचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. कुठल्या विभागाने किती खर्च केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीची स्थिती काय आहे, यावर बैैठकीत चर्चा झाली. त्यानुसार गेल्यावर्षी आजच्या तारखेला ५७ टक्के खर्च झाला होता. तो यावर्षी २५ टक्केच झाला आहे.
यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याची कारणे काय, हे स्पष्ट करण्यास सांगितले. त्वरित कार्यवाही करून पुढील महिन्यात हा बॅकलॉग भरून काढायचा आहे. यासाठी जास्तीचा वेळ देऊन महिनाभरात ही कामे मार्गी लावा, असे आदेश कंद यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)