मेखळीतील युवकांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:51+5:302021-05-19T04:11:51+5:30
मेखळीतील युवकांनी उभारला कोरोनाविरुद्ध लढा मेखळी : सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना वेळेवर बेड, ...

मेखळीतील युवकांनी
मेखळीतील युवकांनी
उभारला कोरोनाविरुद्ध लढा
मेखळी : सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा, रक्त व औषधे यांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच बऱ्याच लोकांपुढे या गोष्टी उपलब्ध कशा होतील याचे देखील मोठे आव्हान असते. ही बाब लक्षात घेऊन मेखळी गावातील व परिसरातील गरजू रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी बारामती तालुक्यातील मेखळी येथे ‘मेखळी कोविड योद्धा’ या ग्रुपच्या माध्यमातून गावातील युवक पुढे सरसावले आहेत.
गावातील सामाजिक भान असलेल्या युवकांनी एकत्र येऊन ‘मेखळी कोविड योद्धा’ ग्रुप सुरू केला आहे. ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागात गेल्यानंतर कोरोनाचे उपचार व औषधे उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत होत्या, ही बाब लक्षात घेऊन रुग्णांना व कुटुंबीयांना आधार देण्यासाठी या ग्रुपची स्थापना झाली. यामध्ये गावातील स्टाफ, मेडिकल व इतर व्यावसायिक, नोकरदार तसेच पदाधिकारी यांचा समावेश आहे. यांच्या माध्यमातून गावातील व परिसरातील साधे बेड, ऑक्सिजन बेड ,व्हेंटिलेटर बेड, रुग्णांना प्लाझ्मा तसेच रुग्णांना अंड्याचे ट्रे, अक्टिव्ह रुग्णांना वाफेचे मशीन, फॅबीफ्लू व विटॅमीन-डी गोळ्या व जेवणाचे डब्बे पोहचवण्यात आले. पुढील मदतकार्य चालू आहे. त्याचबरोबर जी औषधे सहज उपलब्ध होत नाहीत ती ग्रुपमधील टफ त्यांच्या संपर्कातून उपलब्ध करून देऊन रुग्णांना सहकार्य करतात. परिचारिका दिनानिमित्त ग्रुपच्या वतीने गावातील परिचारिका, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचा मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड व हॅण्डग्लोज देऊन सत्कार करण्यात आला.
या ग्रुपच्या कामाला पाठबळ देण्यासाठी पांडुरंग कचरे यांनी स्वत:ची रुग्णवाहिका कोरोना काळात वापरण्यासाठी दिली आहे. तर गावातील व परिसरातील लोकांनीदेखील आर्थिक व इतर स्वरूपात मदत केली आहे. तर येणाऱ्या काळात देखील गावाच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण तत्पर राहू, असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले.