मंचर : विहिरीत पोहण्यासाठी गेलेला एक तरुण आज बुडाला. ही घटना खडकी (ता. आंबेगाव) येथे आज दुपारी एकच्या सुमारास घडली. शिवम बाळासाहेब बांगर (वय १९) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृतदेह एनडीआरएफ टीमने बाहेर काढला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मंगळवारी ( दि. २३)आज दुपारच्या सुमारास शिवम हा त्याचा मित्र उमेश बांगर याच्यासोबत खडकी येथील एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होते. काम झाल्यावर प्रचंड गरम व्हायला लागल्याने तो दुपारी एकच्या सुमारास शेतातील विहिरीत पोहायला गेला. ही विहीर ५० ते ५२ फूट खोल असून पाण्याने पूर्णपणे भरलेली आहे. उमेश बांगर याला चांगले पोहता येत नव्हते, त्यामुळे त्याने कंबरेला प्लॅस्टीकचे कॅन बांधले होते. प्लॅस्टीक कॅन बांधून पोहत असताना शिवम बांगर हा सुद्धा पोहू लागला. अचानक शिवम पाण्यामध्ये गटांगळ्या खावू लागला त्याने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात शिवम पाण्यात बुडाला. सुदैवाने उमेशबांगर बालंबाल बचावला गेला. उमेश याने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. बुडालेला तरुण शिवम बांगर याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्यात त्याचा थांगपत्ता लागला नाही. पाणी उपसण्यासाठी ३ पंप लावण्यात आले. शोध घेऊनही शिवमचा शोध लागला नव्हता. त्यामुळे अखेर त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ टीमला बोलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रांत संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 20:40 IST