धनकवडी : बिबवेवाडी येथे भरदुपारी झालेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी धनकवडीतील संभाजी नगर परिसरात एका तरुणावर चार पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात करण शिवतरे ( वय २६ वर्ष, रा. गणेश चौक, आंबेगाव पठार) गंभीर जखमी झाले आहेत. बिबवेवाडी पाठोपाठ सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग घडलेल्या दुसऱ्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थाची परिस्थिती ढासळल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.३० वाजता क्रांती सूर्य महात्मा फुले (तिन हत्ती) चौकाकडून के. के. मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर संभाजीनगर परिसरातील गल्लीत करण याच्यावर हल्ला झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
दरम्यान, जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.