तरुणांबरोबर ज्येष्ठांचाही मोर्चात सहभाग
By Admin | Updated: September 26, 2016 01:34 IST2016-09-26T01:34:53+5:302016-09-26T01:34:53+5:30
गाडीतळावर सोलापूर आणि सासवड रस्त्याने मराठा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी वाहनांची खच्चून गर्दी झाली होती.

तरुणांबरोबर ज्येष्ठांचाही मोर्चात सहभाग
हडपसर : गाडीतळावर सोलापूर आणि सासवड रस्त्याने मराठा मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी वाहनांची खच्चून गर्दी झाली होती. महिला-मुलींसह ज्येष्ठ नागरिकांबरोबर तरुणांचा उत्साह वाखाणण्यासारखाच होता. शिस्तबद्ध पद्धतीने दुचाकी आणि चारचाकी वाहने मार्गक्रमण करीत होती. गोळीबार मैदान, भैरोबानाला, रेसकोर्सच्या बाजूला आणि बी. टी. कवडे रस्ता या परिसरात कोणालाही त्रास होणार नाही, या पद्धतीने वाहने उभी केली होती.
महिला-मुली आणि तरुणांच्या हातात कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधामांना फाशी द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अॅट्रॉसिटी कायद्यातील त्रुटी दूर करा, अशी तळमळ व्यक्त करणारे फलक होते. लहान मुलाला शिवबा वेश परिधान करून एक कुटुंब सहभागी झाले होते. ते सर्वांचेच आकर्षण ठरले. बहुतेकांनी एक मराठा लाख मराठा असे टी शर्ट, टोप्या परिधान केल्या होत्या. प्रत्येक वाहनावर मराठा स्टीकर्स आणि भगवे झेंडे लावले
होते.
सोलापूर रस्त्याने येणाऱ्या गाड्या, गोळीबार मैदान, ईदगाह मैदान या ठिकाणी पार्क करण्यात आल्या. रेसकोर्सच्या उत्तरेकडील मैदान व बी टी कवडे रोड (ढोबळ मैदान) येथे पार्क करण्यात आल्या.