तरुणांनो, जीवनशैली बदला अन् निरोगी व्हा
By Admin | Updated: January 21, 2015 00:43 IST2015-01-21T00:43:00+5:302015-01-21T00:43:00+5:30
ऐन तारुण्यात विविध आजारांनी टाकलेल्या विळख्याचे मूळ तरुणाईच्या आजच्या जीवनशैलीत आहे.

तरुणांनो, जीवनशैली बदला अन् निरोगी व्हा
पुणे : ऐन तारुण्यात विविध आजारांनी टाकलेल्या विळख्याचे मूळ तरुणाईच्या आजच्या जीवनशैलीत आहे. त्यामुळे जीवनशैली बदला आणि निरोगी व्हा, असा मंत्र पुण्याच्या वैद्यकीय क्षितिजावरील नामवंत डॉक्टरांनी दिला.
‘लोकमत’ पुणे कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ‘आजची तरुणाई, बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मते व्यक्त केली. या प्रसंगी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते.
यामध्ये प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, औषधशास्त्राचे अभ्यासक डॉ. पद्माकर पंडित, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. कोमलकीर्ती आपटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग, आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र जगताप, जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वैशाली किराणे, फिजिओथेरपीतज्ज्ञ डॉ. अर्चना रानडे व डॉ. ज्योती पुरोहित, जनरल फिजिशियन डॉ. दिलीप देवधर, जनरल फिजिशियन डॉ. विजय जगताप, बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्वती हळबे, फिटनेसतज्ज्ञ मनाली मगर, आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे, ऐश्वर्या मुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा मुधोळकर, होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. इंद्रनील बावडेकर यांनी सहभाग घेतला होता.
जीवनशैली ही व्यक्तिमत्त्व आणि कामाचे स्वरूप यानुसार ठरते. जीवनशैलीची व्यक्तिमत्त्वाशी सांगड घालत आरोग्य जपायला हवे. आहार, विचार, झोप यादृष्टीने कामांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. तणावापासून दूर राहायचे असेल तर ज्या गोष्टी केल्याने छान वाटते, त्या वाढवत न्याव्यात. म्हणजे छान न वाटणाऱ्या गोष्टी आपसूकच कमी होतील, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
सध्या अनेकांना होणारे किडणीस्टोन, वंध्यत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना जीवनशैलीच कारणीभूत आहे. ती बदलायची तर शाळा आणि महाविद्यालयीन स्तरापासून विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि मानसिक शांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यात अध्यात्म अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते, असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले.
ग्रामीण भागातील लोकांमध्ये मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, अॅनिमिया अशा आजारांचे प्रमाण खूप कमी असते. पण तुलनेने शहरात हे सर्व आजार दिसतात, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. वेळेचे नियोजन आणि वेळेचा योग्य वापर केल्यास कामाचा ताण न येता चांगले जीवन जगता येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बाहेर खाण्याचे वाढते प्रमाण आणि सातत्याने मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही अशा स्क्रीनकडे लागलेले डोळे यांचा आरोग्यावर घातक परिणाम होतोय. वेळच्या वेळी आणि किमान सात तास झोप होणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकच आहे, अशी अपेक्षा एकूण चर्चेतून व्यक्त झाली.
(प्रतिनिधी)
सामाजिक आरोग्यही जपा
जीवनशैलीत सुधारणा केल्यास आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात निश्चित कमी होऊ शकतात. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञांनी 'लोकमत'च्या व्यासपीठावरून केले.