युवा चेहऱ्यांबरोबरच अनुभवींना संधी देणार
By Admin | Updated: March 22, 2015 23:03 IST2015-03-22T23:03:00+5:302015-03-22T23:03:00+5:30
सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल.
युवा चेहऱ्यांबरोबरच अनुभवींना संधी देणार
भवानीनगर : सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल. नव्या जुन्यांचा मिलाफ केला जाईल. संधी न मिळाल्यास इतर अनुभवींनी थांबण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते.
दरम्यान, पवार यांनी केंद्र, राज्य सरकारसह शेतकरी संघटनेवर चौफेर टिका केली. ते म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी बुडला तर राज्य बुडेल, याबाबत आमदार भरणे यांच्यासह आपण मांडलेल्या लक्षवेधीवर अधिवेशनामध्ये बोलणार आहोत. अडचणीतील साखर धंद्याबाबत शेतकरी संघटना बोलायला तयार नाहीत. बारामती शहरातील शारदा प्रांगणाला तर ‘आंदोलनाचे प्रांगण’ असे स्वरूप आले होते. आता मात्र, ते रस्ते अडवत नाही किंवा आंदोलने करीत नाहीत.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांची भाषणे झाली. यावेळी ‘छत्रपती’चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मारुतराव चोपडे, जालिंदर कामठे, प्रशांत
काटे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, भाऊसाहेब करे,
विठ्ठल निंबाळकर, संभाजी होळकर, रामचंद्र निंबाळकर, तुकाराम काळे, सचिन सपकळ आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)
उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यावर मुलाखती, चर्चा होईल. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा करून अंतिम यादी निश्चित केली जाईल. त्यामध्ये युवा, अभ्यासू संचालकांबरोबरच अनुभवींना संधी दिली जाईल. यंदा अर्ज माघारी घेण्याचा अर्ज घेतला जाणार नाही. जय भवानी पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज माघारी घ्यावेत. साखरेवर नियंत्रण असताना दर देखील नियंत्रित होते. नियंत्रणामुळे बाजारपेठेत अधिक साखर येत नव्हती. ऊसबाबत होणाऱ्या अफवा, चर्चांवर सभासदांनी विश्वास ठेवू नये. गाळप क्षमता वाढविल्यानंतर कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊन दिला जाणार नाही.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री