तुम्हीही व्हा पुणेकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 01:15 IST2016-05-10T01:15:47+5:302016-05-10T01:15:47+5:30

पुण्यात एकदा व्यक्ती आली, की ती तावूनसुलाखून निघते. मांजर कशी कुठूनही पडली तरी चार पायांवरच उभी रहाते, तसाच मीही, कितीही टीका झाली तरी इथे दोन पायांवर उभा आहे

You too be Pune! | तुम्हीही व्हा पुणेकर !

तुम्हीही व्हा पुणेकर !

पुणे : पुण्यात एकदा व्यक्ती आली, की ती तावूनसुलाखून निघते. मांजर कशी कुठूनही पडली तरी चार पायांवरच उभी रहाते, तसाच मीही, कितीही टीका झाली तरी इथे दोन पायांवर उभा आहे. त्यामुळे जयंतराव ‘पुणेरीपण’ अनुभवण्यासाठी पुण्यात याचं... असा खास ‘पुणेरी’ टोला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना लगावला... आणि एखाद्या मुरब्बी नेत्याप्रमाणे तितक्याच दिलखुलासपणे त्यांनी हसून बापट यांना दाद दिली.
निमित्त होते, कृष्णकांत कुदळे फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याचे. बापट आणि पाटील यांच्यात रंगलेल्या विनोदात्मक वाक्युद्धाने उपस्थितांचे मनोरंजन झाले. पाटील यांनी भाषणात ‘प्रत्येक गोष्टीला भाग्य लागते, खरे तर मंत्रिमहोदयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याची प्रथा आहे; पण बापट उशिरा आले आणि तो मान मला मिळाला... शेवटी नशीब असावे लागते... मी ‘नशिबाबद्दलच’ बोलत आहे, असा मिस्कील टोला त्यांनी बापट यांना मारला. पण, पक्के पुणेकर असलेले बापट स्वस्थ बसतील तरचं नवल! त्यांनीही मग, पाटील यापुढील काळात ‘माजी’ राहतील असे वाटत नाही. ते मंत्रीही होऊ शकतात, ही संधी मी त्यांना दुसऱ्यांना द्यायला तयार आहे, असा पलटवार केला आणि सभागृहात हशा पिकला.
या वेळी जयंत पाटील यांच्या हस्ते वामन जाधव यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, डॉ. परवेझ ग्रांट यांना शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार तसेच मुक्ता मनोहर यांना सुनील दत्त पुरस्कार तर अभिनेत्री अनुजा साठे हिला नर्गिस दत्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष कृष्णकांत कुदळे आणि मंगल कुदळे उपस्थित होते. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मोहन टिल्लू यांनी आभार मानले.
> चांगले बघण्याचा प्रयत्न करावा
विधानसभेत आम्ही एकमेकांच्या गचांड्या धरतो, असे सरसकट लोकांना वाटते. मतभेद असतात; पण आम्ही विषयाचा आग्रह धरतो. संसदीय मार्गाने काही गोष्टी कराव्याच लागतात. विधानसभेत कटू प्रसंग आले, तर वातावरण चांगले कसे करायचे, याचा प्रयत्न पाटील करतात, असा आवर्जून उल्लेखही बापट यांनी केला. तसेच समाजात नेहमीच वाईट घडते, अशी एक निराशेची मानसिकता तयार झाली आहे; पण वाईट थोडं घडतं आणि चांगलंच जास्त घडत असतं. नेहमी चांगलं बघण्याचाच प्रयत्न करावा, याकडेही बापट यांनी लक्ष वेधले. तर, जाता-जाता जयंत पाटील यांनी पुण्यात भांडवलदारांची हॉस्पिटल्स खूप असून, सामान्यांचंच भांडवल अधिक जातं, असे सांगून पुण्याच्या आरोग्यक्षेत्रातील वास्तवावर बोट ठेवले.
अनेक वर्षांपासून कुदळे राष्ट्रवादीचे उपाध्यक्षच आहेत. कुदळे यांच्याकडे पाहून ‘अजून राष्ट्रवादीतचं आहात ना,’ अशी मिस्कील टिप्पणी करीत ‘बघा जरा विचार करा,’ असे सांगून बापट यांनी पाटील यांना सूचित केले.

Web Title: You too be Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.