मुलांच्या अभ्यासासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:54+5:302021-07-23T04:08:54+5:30
गेल्या दीड वर्षापासून मुलांची शाळा नाही. शाळेत पाच ते सात तासांचे ते वातावरण घरामध्ये ऑनलाईन क्यासच्या माध्यमातून अवघ्या दोन-तीन ...

मुलांच्या अभ्यासासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल
गेल्या दीड वर्षापासून मुलांची शाळा नाही. शाळेत पाच ते सात तासांचे ते वातावरण घरामध्ये ऑनलाईन क्यासच्या माध्यमातून अवघ्या दोन-तीन तासांमध्ये तयार होणे कठीणच त्यामुळे मुलांच्या अभ्यासावर आणि अभ्यासातील एकाग्रतेवर निश्चित परिणाम होणार आहेच. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाची गाडी रुळावर आणण्यासाठी पालकांनी त्यांच्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहेच. लहाणपणीच मुलांना अभ्यासाची सवय लागली नाही तर मोठ्या इयत्तेत गेल्यावरही त्यांना अभ्यासाचे महत्व राहणार नाही व त्यांना अभ्यासाची बैठक तयार करायला वेळ लागणार आहे. मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये त्यांची एकाग्रता वाढावी यासाठी काही विशेष गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागणार आहे त्यासाठीच्या काही टीप्स.
अभ्यासाला प्राधान्य द्या : नोकरीच्या निमित्ताने मुलांचे आई-वडील दोघेही बाहेर जातात, ते घरी आल्यावरही त्यांच्या थकवा किंवा इतर घरकामे, विरंगुळा आदी गोष्टीत घरातील वेळ जातो. त्यामध्ये मुलांना फक्त अभ्यासाच्या सुचना देऊन होतात प्रत्यक्ष अभ्यास घेतला जात नाही. त्यामुळे आई-वडीलांनी त्यांच्या बिझी शेड्युलमधून अभ्यासासाठी खास वेळ काढणेे आवश्यक आहे. त्यामुळे पालाकंनी सकाळी किंवा सायंकाळी अभ्यासाचे वेळापत्रक करून त्या वेळेत समोर बसून मुलांचा अभ्यास घेण्याला प्राध्यान दिलेच पाहिजे.
अभ्यासासाठी जागा निश्चित करा : मुलांच्या अभ्यासासाठी घरातील एक जागा निश्चित करा, दरररोज त्याच जागी बसून अभ्यास करण्याची सवल त्यांना लावा. जागा एकच असेल तर मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. जागा बदलत असेल तर अभ्यास करता करता त्याचे नव्या गोष्टींकडे लक्ष जाईल व त्यांची एकाग्रता कमी होईल.
पाहुणे -मित्रांचा अभ्यासात व्यत्यय नकोच : ऐन अभ्यासाच्या वेळी मुलांचे किंवा पालकांचे मित्र-नातेवाईक आले तर शक्यतो त्यांच्याशी अभ्यासाची वेळ सोडून गप्पा मारत बसू नका. शक्यतो अभ्यासाच्या वेळेत मित्र- नातेवाईक येऊच नयेत अशी दक्षता बाळगा व इतर वेळी त्यांना वेळ द्या.
मुलांचा अभ्यास सुरु असताना तुम्ही मोबाईल पाहू नका :
मुले अभ्यासाला बसले असताना पालकांनीही मोबाईलवर विविध व्हिडीओ पाहणे टाळावे, व्हाट्स्अप, फेसबुक आणि इतर साईटवर येणारे विविध मेसेज वाचताना नकळत आपला मूड बदलत असोत, विनोदावर आपण हसतो या साऱ्या गोष्टीचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर नकळत होत असतो. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या वेळात मोबाईल, टीव्ही आदी गोष्टी टाळाव्यात आणि मुलांच्या सोबतच पालकांनीही एखादे पुस्तक, वृत्तपत्र वाचत रहावे त्यामुळे अभ्यासाचे वातावरण तयार होते.
अभ्यासाआधिच जड आहार देऊ नका : अभ्यासाला बसण्याआधी मुलांना भरपेट आणि जड आहार देऊ नका, त्यामुळे मुलांमध्ये सुस्ती येऊ शकते व अभ्यासादरम्यान त्यांना झोप लागू शकते त्यामुळे हलका आहार द्या जेणेकरून त्यांना अभ्यास करताना ना भुक लागेल ना सुस्ती चढेल. शिवाय अभ्यास करातना बाटली किंवा तांब्याभरून पाणी शेजारी ठेवावे अधून मधून पाणी प्यायला द्यावे त्यामुळे अभ्यास करताना मानसिक थकवा आलाच तर तो रिलीफ होईल.
अभ्यास करताना ब्रेक महत्वाचा : सलग दोन-तीन तास अभ्यास केला तर मुले थकून जातात त्यामुळे दर तासाने मुलांना अगदी छोटा ब्रेक देणे आवश्यक आहे. त्यामुळे मुले थकून न जाता ब्रेक नंतर पुन्हा जोमाने व एकाग्रतेने अभ्यासाला लागतात. मात्र हा ब्रेक इतकाही मोठा नसावा की मुलांची अभ्यासाची लिंक तुटेल अगदी पाच मिनिटांचा ब्रेक द्यावा त्यामध्ये मुलांनी टीव्ही मोबाईल न पाहता केवळ पाय मोकळे करणे अपेक्षित आहे.