पुणे : ‘ज्या बसने प्रवाशांना १२ वर्षे रोज १८ तास सेवा दिली आणि आमच्या संस्थेला लक्ष्मी रूपाने उत्पन्न दिले आहे. तिला आपण भंगार बस कशी काय म्हणू शकता. आपल्या घरात पण ७०-८० वय वर्षे पूर्ण झालेले आपले नातेवाईक असतात, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते. त्यांना तर आपण नाही ना भंगारात काढत?’... हे कोणत्याही कार्यक्रमातील भाषण किंवा प्रत्यक्ष संवादातील वाक्य नसून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला भंगार म्हणून उल्लेख केलेल्या एका प्रवाशाच्या तक्रारीवर तक्रार निवारण कक्षाकडून पाठविलेले उत्तर आहे. पीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस १० वर्षांहून अधिक कालावधीच्या असल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. खिडक्या तुटलेल्या, पत्रा उचकटलेला, खराब झालेली आसने, उडालेला रंग अशा अनेक तक्रारी असतात. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. या तक्रारी पीएमपीच्या तक्रार निवारण कक्षाकडे करता येतात. वॉट्स अप, ईमेल किंवा दुरध्वनीवरही तक्रारी करता येतात. अनेक तक्रारी बसच्या दुरावस्थेबाबत असतात. या तक्रारींची दखल घेत कक्षाकडून संबंधित तक्रारदार प्रवाशाला तक्रार निवारणबाबत मोबाईलवर संदेश पाठवून माहिती दिली. बहुतेक संदेशामध्ये त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, सेवा सुधारण्यासाठी सहकार्य करत असल्याबद्दल संबंधित प्रवाशाचे धन्यवादही मानले जातात. तर काही संदेशामध्ये मात्र हे सौजन्य दाखविले जात नसल्याचा अनुभव प्रवाशांना येतो.असा अनुभव पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांना आला आहे. त्यांनी वॉटस अप हेल्पलाईनवर एका दुरावस्था झालेल्या बसची तक्रार केली होती. त्यामध्ये त्यांनी बसचा ‘भंगार’ असा उल्लेख केला होता. तक्रार निवारण कक्षातून या तक्रारीला मोबाईलवर संदेशाद्वारे उत्तर देताना ‘भंगार’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच बसच्या दुरावस्थेची तुलना थेट घरातील ज्येष्ठ नातेवाईकांशी केली आहे. ज्येष्ठांना आपण भंगारात काढत नाही, असे म्हणत त्यामध्ये थेट दुरावस्था झालेल्या बसची तुलना ज्येष्ठांशी केल्याचे शितोळे यांनी सांगितले. संबंधित कर्मचाºयाची बसविषयीची आस्था यामधून दिसत असली तरी त्यांनी दिलेले उत्तर अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
..ज्येष्ठांना आपण भंगारात काढत नाही ना! पीएमपी कर्मचाऱ्याचे प्रवाशाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 21:25 IST
आपल्या घरात पण ७०-८० वय वर्षे पूर्ण झालेले आपले नातेवाईक असतात, त्यांना आपण नाही ना भंगारात काढत?’..
..ज्येष्ठांना आपण भंगारात काढत नाही ना! पीएमपी कर्मचाऱ्याचे प्रवाशाला उत्तर
ठळक मुद्देपीएमपीच्या ताफ्यातील अनेक बस १० वर्षांहून अधिक कालावधीच्या असल्याने खिळखिळ्यापीएमपीविषयी प्रवाशांच्या अनेक तक्रारी