पुणे:- जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी देण्यात येणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ प्रकाशक आणि राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांची, तर साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. दरवर्षी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून प्रकाशक संघातर्फे जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मात्र यावर्षी उद्धवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादूभार्वामुळे सध्या केवळ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, भविष्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपल्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षा शशिकला उपाध्ये, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आणि प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीने कळविले आहे. आत्तापर्यंत जीवनगौरव पुरस्कराने पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, बेळगाव येथील नवसाहित्य प्रकाशनाचे जवळकर बंधू, अमरावती येथील नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे आप्पा परचुरे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. तर, साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने आजपर्यंत द.मा.मिरासदार, निरंजन घाटे आदी साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे.
मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 13:50 IST
प्रतिभा रानडे साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराच्या मानकरी
मराठी प्रकाशक संघाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिलीप माजगावकर यांना जाहीर
ठळक मुद्देउत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, जीवनगौरव आणि साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारांची घोषणा