‘कुकडी’तील पाणीसाठ्याने वार्षिक सरासरी ओलांडली
By Admin | Updated: September 11, 2014 04:32 IST2014-09-11T04:32:04+5:302014-09-11T04:32:04+5:30
पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे भरणार का, असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असताना, परतीच्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याने मागील वर्षींची सरासरी ओलांडली आहे

‘कुकडी’तील पाणीसाठ्याने वार्षिक सरासरी ओलांडली
येडगाव : पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे भरणार का, असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असताना, परतीच्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याने मागील वर्षींची सरासरी ओलांडली आहे.
मागील वर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने माणिकडोह धरणवगळता इतर धरणे लवकरच भरली होती. परंतु या वर्षी महिनाभर पावसाने दडी मारल्याने धरणं भरण्याविषयी साशंकता होती. पुढील हंगामाच्या पाणीसाठ्याची चिंता वरुणराजाने दूर केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात २६०४८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. टक्केवारीत तो ६५ टक्के इतका होता. अद्यापदेखील कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात अधून-मधून चांगलाच पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
येडगाव धरणातील डावा कालव्याला गेल्या ४२ दिवसांपासून पाणी सुरू असून, त्या कालव्यांतर्गत आजपर्यंत ४५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रात १६०९ दशलक्ष घनफूट, वडजमधून कालव्यास ९७२ दशलक्ष घनफूट, तर नदीपात्रात २४९३ दशलक्ष घनफूट, डिंंभा धरणातून कालव्याला १५२१, तर नदीपात्रात ३१०९ दशलक्ष घनफूट व पिंंपळगाव जोगे धरणातून नदीपात्रात ७४, तर कालव्यास २०२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. प्रकल्पात आजपर्यंत ४१ टीएमसी नवीन पाणी आले आहे.