जिल्हा परिषदेची यंदा स्वच्छतेची वारी
By Admin | Updated: June 18, 2015 23:29 IST2015-06-18T23:29:37+5:302015-06-18T23:29:37+5:30
सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली

जिल्हा परिषदेची यंदा स्वच्छतेची वारी
पुणे : सर्वांनाच आता वारीचे वेध लागले असून, पुणे जिल्हा परिषद यंदा ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश घेऊन संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या वारीत आपली ‘स्वच्छतेची वारी’ घेऊन जाणार आहे. यात १०० स्वयंसेवक सहभागी होणार असून, ते वारीपूर्व व वारीनंतर मुक्कामी गावात स्वच्छता करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.
दर वर्षीप्रमाणे या वर्षी ८ जुलै ते २८ जुलैदरम्यान श्री संत ज्ञानेश्वरमहाराज, श्री संत तुकाराममहाराज व श्री संत सोपानदेवमहाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा आहे. यात राज्यभरातून सुमारे ७ ते ८ लाख वारकरी सहभागी होतात. जिल्ह्यातील हवेली, पुरंदर, व दौड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ३६ गावांत या पालख्यांचा मुक्काम व विसावा होतो. मात्र, वारीच्या मुक्कामानंतर त्या गावाच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ग्रामस्थांना या अस्वच्छतेला सामोरे जावे लागते. यासाठी यापूर्वी जिल्हा परिषद या गावांना सोयीसुविधेसाठी सुमारे ३५ लाखांचा निधी देते; मात्र यंदा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ते आपल्या १०० स्वयंसेवकांची या वाऱ्यांमध्ये स्वच्छतेची वारी काढणार आहेत. यात जिल्हा कक्षातील १० तज्ज्ञ, तालुका स्तरावरील १२ अधिकारी, २२ स्वयंसेवक प्रतिनिधी, पालखीसमवेत राज्यातील ६ तज्ज्ञ, एनएसएसचे ५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही टीम संबंधित ग्रामस्थांसमवेत संपूर्ण गाव स्वच्छ करून घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणार आहे. त्यामुळे मुक्कामी गावे व विसावे वारीनंतर स्वच्छ व सुंदर राहून ग्रामस्थांची या त्रासातून सुटका होणार आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास जे कोणी इच्छुक असतील, त्यांनी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ इवभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
सोयीसुविधांसाठी ३५ लाख
या वर्षी पालखीमार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत पालखीदरम्यान करायच्या सोयीसुविधांकरिता मुक्काम गाव रक्कम २ लाख, पालखी विसावा रक्कम ५० हजार तसेच श्री संत सोपानमहाराज पालखी मुक्कामासाठी ७५ हजार व विसाव्यासाठी २५ हजार रुपये, असे ३५ लाख रुपये इतका निधी देणार आहे.