यवतवर थोरात गटाचे वर्चस्व

By Admin | Updated: August 7, 2015 00:48 IST2015-08-07T00:48:31+5:302015-08-07T00:48:31+5:30

दौंड तालुक्यातील सर्वांत मोठी समजल्या जाणाऱ्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार थोरात गटाने निसटता विजय मिळविला आहे

Yavat Thorat Group domination | यवतवर थोरात गटाचे वर्चस्व

यवतवर थोरात गटाचे वर्चस्व

यवत : दौंड तालुक्यातील सर्वांत मोठी समजल्या जाणाऱ्या यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार थोरात गटाने निसटता विजय मिळविला आहे. अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागांवर थोरात गट, तर ८ जागांवर आमदार कुल गटाने विजय मिळविला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर थोरात गटाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवली आहे. कुल गटाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परत एकदा धक्का बसला आहे. विधानसभेची आघाडी लक्षात घेता, यवतमधून कुल गटाने मोठ्या विजयाची अपेक्षा केली होती. मात्र, थोरात गटाने विजय खेचून आणत परत एकदा त्यांचे वर्चस्व सिद्ध केले.
माजी आमदार थोरात गटाचे समर्थक पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड व माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांच्या नेतृत्वाखालील यवत विकास आघाडीने ९ जागांवर बाजी मारली. तर, विद्यमान आमदार कुल गटाचे समर्थक भीमा पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके यांच्या नेतृत्वाखालील श्री काळभैरवनाथ पॅनलने ८ जागांवर विजय मिळविला.
वॉर्ड क्र.१ मधील थोरात गटाने परत एकदा त्यांचे वर्चस्व सिद्ध करत तीनही जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. यवत विकास आघाडीचे भाऊसाहेब दोरगे (८५४), वर्षा दोरगे (९१७) व सोमनाथ कऱ्हे (८०७ ) हे तीनही उमेदवार विजयी झाले.
वॉर्ड क्र.२ मध्येदेखील थोरात गटाने मोठा विजय मिळविला. यवत विकास आघाडीच्या समीर दोरगे (९१०) व रझिया तांबोळी (७८८) यांनी भरघोस मते मिळवित विजयी मिळविला. थोरात गटातून बंडखोरी करून उपसरपंच नाथदेव दोरगे यांच्या नेतृत्वाखालील यवत ग्रामविकास आघाडीमधून उभ्या असलेल्या उमेदवारांबरोबरच कुल गटाला सदर वॉर्डामधून मोठा धक्का बसला आहे.
वॉर्ड क्र. ३ मध्ये मागील २५ वर्षांपासून असलेले कुल गटाचे वर्चस्व थोरात गटाने मोडीत काढत सर्वच्या सर्व तिन्ही जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. यवत विकास आघाडीचे सुभाष यादव (७४८), किशोर शिंदे (६९९) व शीतल दोरगे (६५६) विजयी झाले.
वॉर्ड क्र.४ मध्ये कुल गटाने यश मिळविले, मात्र क्रॉस वोटिंग झाल्याचा फटका येथे त्यांना बसला. सदर वॉर्डात २ जागांवर कुल गट, तर १ जागेवर थोरात गटाने बाजी मारली. श्री काळभैरवनाथ पॅनलचे उमेदवार माजी उपसरपंच प्रकाश दोरगे (७८८) व मंदा शेंडगे (८३४) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर यवत विकास आघाडीच्या हेमलता दोरगे (७८८ मते), या केवळ ८ मतांनी निवडून आल्या.
वॉर्ड क्र.५ मध्ये मात्र कुल गटाने एकतर्फी मोठा विजय मिळविला. श्री काळभैरवनाथ पॅनलचे उमेदवार राजेंद्र कदम (९२३) , मनीषा बधे (९९६) व राणी जांबले (१००१) हे मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले. थोरात गटाला सदर वॉर्डात मोठा धक्का बसला आहे.
वॉर्ड क्र.६ मध्ये सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. कुल गटाचे माजी सरपंच दशरथ खुटवड यांनी थोरात गटाचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांचा येथे मोठा पराभव केला. श्री काळभैरवनाथ पॅनलचे उमेदवार दशरथ खुटवड (९१९), हौसाबाई भिसे (८७९) व लता देवकर (८९९) हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने या वॉर्डात थोरात गटाला धक्का बसला आहे.
यवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुल व थोरात या दोन्ही गटांनी वॉर्ड क्र.६ मधील कुल गटाचे माजी सरपंच दशरथ खुटवड व थोरात गटाचे माजी उपसरपंच सदानंद दोरगे यांच्यातील लढत प्रतिष्ठेची केली होती. दशरथ खुटवड कुल गटातील प्रमुख उमेदवार, तर सदानंद दोरगे थोरात गटातील प्रमुख उमेदवार व त्यांच्या पॅनलचे नेतृत्व करीत होते. मात्र, या ठिकाणी कुल गटाचे माजी सरपंच दशरथ खुटवड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. मागील पंचवार्षिक निवडणुकीतदेखील थोरात गटाची सत्ता येऊनदेखील त्यांच्या एका प्रमुख उमेदवाराचा पराभव झाला होता. आता परत तसाच प्रकार घडल्याने थोरात गटाची अवस्था परत एकदा गड आला मात्र सिंह गेला, अशी झाल्याची चर्चा गावात होती.
आठ मतांमुळे सत्तासमीकरण बदलले
यवतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावर सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. येथे थोरात गटाने ९ जागांवर, तर कुल गटाने ८ जागांवर विजय मिळविला. मात्र, सर्व निकालाला कलाटणी देणारा निकाल ठरला. वॉर्ड क्र.४ मधील तीनपैकी दोन जागांवर कुल गटाचे उमेदवार विजयी झाले. मात्र, एका जागेवर केवळ आठ मतांनी थोरात गटाचा उमेदवार विजया झाला. यामुळे केवळ आठ मतांनी गावचे सत्ता समीकरण बदलले, अशी चर्चा गावात होती.
थोरात गटाचा जल्लोष
गावात परत एकदा ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळविल्याने थोरात गटाने गावात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा केला. कुल गटाच्या काही विजयी उमेदवारांनीदेखील फटाके वाजविले. मात्र, गावातील सत्ता मिळाली नसल्याने कुल गटात मोठी निराशा पसरली होती.

Web Title: Yavat Thorat Group domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.