मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:58+5:302021-01-08T04:31:58+5:30
भोर : कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण घटले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ...

मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द
भोर : कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण घटले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील २७, २८ व २९ जानेवारी महिन्यात होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. या सोबतच १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश व निर्देशानुसार धार्मिक विधी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थान ट्रस्टी मंदिर पूजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना उपविभागीय आधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी दिल्या आहेत.
वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील काळूबाई ही महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. २७ २८ व २९ रोजी देवीची मुख्य यात्रा आहे. मात्र, महिनाभर देवीचा उत्सव चालतो. या कालावधीत मांढरगडावर सुमारे सात ते आठ लाख भाविक येत असतात. त्यामुळे यात्रा-जत्रांचा गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे थांबले नाही. याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील यात्रा जत्रासाठी प्रशासनाकडून अद्याप परवानगी दिलेली नाही.
दरम्यान प्रशासनाने मांढरदेवीची यात्रा रद्द केली आहे. १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत मांढरदेवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी यात्रा काळात व ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत दर्शनाला येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रा रद्द झाल्याने भोरवरून आंबाडखिंड घाटातून मांढरदेवीला जाणारे भाविक जाणार नाहीत, याचा परिणाम स्थानिक व्यवसायिकांवर होणार आहे.