येत्या 6 ऑगस्टला सत्यमेव जयते वॉटर कपचा पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:31 IST2017-07-27T20:28:01+5:302017-07-27T20:31:56+5:30
गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्तकरण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

येत्या 6 ऑगस्टला सत्यमेव जयते वॉटर कपचा पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार
पुणे, दि. 27 - गेल्या वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा 30 तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या वॉटर हिरोज चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने दि. 6 आॅगस्ट रोजी ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2017’ पुरस्कार सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि 4000 ग्रामस्थ उपस्थित राहाणार आहेत. स्पर्धेतील तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार असल्याची माहितीपानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. यंदाच्या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत 30 तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते वॉटर कप ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी एक शंभर मार्कांची गुणांकन पत्रिका तयार करण्यात आली आहे. जे ही पत्रिका सोडवतील तेच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अगदी गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी गावक-यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत करून देण्यात आल्या आहेत. ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे, मग रक्कम स्वरूपात बक्षिसे कशासाठी? याविषयी विचारले असता स्पर्धेच्या 45 दिवसाच्या कालावधीत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी हा त्यामागचा उददेश आहे. ही बक्षिसे 4 कोटी 10लाख रूपयांची आहेत, 10 लाख रूपये हे सातत्याचे बक्षिस आहे. झाडे जगलीआहेत का? शोष खडडे कार्यरत आहेत का? यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी हे बक्षिस देण्यात येणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.
अशी घेतली जाते स्पर्धा
एखाद्या तालुक्याची निवड झाल्यानंतर त्यांना आमीर खानच्या सहीचे पत्र दिले जाते. ग्रामसभेत ठराव केल्यानंतर स्पर्धेसाठी गावाने अर्ज करायचा, मग ज्या लोकांना प्रशिक्षण द्यायचे आहे अशा पाच लोकांची नावे कळवायची यात दोन महिला असणे बंधनकारक आहे. यापूर्वी ज्या गावांमध्ये जलसंधारण झाले आहे अशाच गावांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात येते. जलसंधारणाची कामे कशी करायची याचे तांत्रिक ज्ञान त्यांना देण्यात येते. पाणी फाऊंडेशनने एक अँप तयार करण्यात आले आहे, त्यात स्पर्धेच्या नियमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच पाणी फाऊंडेशन आणि वॉटर कपचा प्रवास मांडणा-या ‘दुष्काळाशी दोन हात’ ही डॉक्युमेंट्ररी तयार करण्यात आली असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले.