‘एसएनडीटी’त वाटल्या चुकीच्या प्रश्नपत्रिका
By Admin | Updated: March 23, 2017 04:30 IST2017-03-23T04:30:25+5:302017-03-23T04:30:25+5:30
एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना

‘एसएनडीटी’त वाटल्या चुकीच्या प्रश्नपत्रिका
पुणे : एसएनडीटी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींना बुधवारी इंग्रजी विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली, तसेच दीड तासानंतर हाताने लिहिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे विद्यार्थिनींची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे सकाळी अकरा वाजता परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थिनींना दुपारी ३.३० वाजेपर्यंत पेपर द्यावा लागला.
बुधवारी सकाळी अकरा वाजता इंग्रजी विषयाचा पेपर देण्यासाठी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रात बसल्या. सर्व विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. मात्र, त्यातील सर्व प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थिनींनी ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींच्या प्रश्नपत्रिका जमा करण्यात आल्या. दुपारी १२.३० वाजता सर्व विद्यार्थिनींना हाताने लिहिलेली इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी दुपारी ३.३० वाजेपर्यंत पेपर लिहून दिला. मुंबई येथील परीक्षा विभागाकडून चुकीची प्रश्नपत्रिका आल्यामुळे हा गोंधळ झाला, असे दूरशिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.