लेखी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

By Admin | Updated: May 7, 2016 05:14 IST2016-05-07T05:14:43+5:302016-05-07T05:14:43+5:30

इंदोरी (ता. मावळ) येथील महाराष्ट्र राज्य महसूल खात्याच्या गट नंबर ४२४ मधील २५ गुंठे जागेवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी अतिक्रमण केले असून, वडगाव मावळचे

Written order | लेखी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

लेखी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

वडगाव मावळ : इंदोरी (ता. मावळ) येथील महाराष्ट्र राज्य महसूल खात्याच्या गट नंबर ४२४ मधील २५ गुंठे जागेवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी अतिक्रमण केले असून, वडगाव मावळचे तहसीलदार यांनी मंडलाधिकारी तळेगाव दाभाडे यांना अतिक्रमण काढण्यासाठी लेखी आदेश दिले असतानादेखील अधिकारी आणि तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यामधील असलेल्या आर्थिक संगनमतामुळे कित्येक वर्षांपासून अतिक्रमण काढण्यात आले नाही.
सदर शासकीय जमिनीवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी पाणी अडवण्यासाठी बांधकाम केले असून, शासकीय जागेत डांबरी रस्तादेखील बनवण्यात आला असल्याचा अहवाल मंडलाधिकारी यांनी दिला आहे. तोलानी एज्युकेशन फाउंडेशन डॉ. नंदलाल तोलानी चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. नंदलाल तोलानी यांनी इंदोरी येथील शेतजमीन खरेदी साठेखताने घेऊन त्या जमिनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता वेळोवेळी १० लाख चौ. फूट अनधिकृत बांधकाम केले आहे. मंडलाधिकारी यांनी मात्र शासकीय जमिनीवर तोलानी एज्युकेशन फाउंडेशनचे अतिक्रमण केले नसल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी शासकीय मोजणी केलेली नाही. अर्जदारांचा जबाबही घेतला नाही. अशा प्रकारे तोलानी एज्युकेशन फाउंडेशन व डॉ. नंदलाल तोलानी यांनी वेळोवेळी कूळकायदा शाखेकडे खोटी शपथपत्रे, चुकीची माहिती सादर करून कूळकायदा विभागाची फसवणूक केली आहे, असा आरोप इंदोरी येथील शेतकरी प्रदीप तुकाराम भालेकर यांनी केला आहे. (वार्ताहर)

तोलानी एज्युकेशन फाउंडेशन यांनी महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी हटवण्यात आले होते. ट्रस्टने पुन्हा अतिक्रमण केले असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू व दोन दिवसांत अतिक्रमण काढून टाकू. अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करू.
- शरद पाटील, तहसीलदार, मावळ

शासनाच्या जागेवर आमचे कोणतेही अतिक्रमण नाही. शासनाचा भूखंड रिकामा आहे. शासकीय अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. जमिनीचा सर्व व्यवहार आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून केला आहे. शिवाय शासकीय जागेतून डांबरी रस्ता काढण्यात आला आहे.
- अ‍ॅड. सादिक अली सय्यद, कायदेशीर सल्लागार, तोलानी फाउंडेशन

Web Title: Written order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.