पुणे : ‘दर क्षणाला बदलते ती कविता, आयुष्य सहज जगताना झाडावर जे फूल उमलते ती कविता. शहाण्यासारखे जगावे आणि वेड्यासारखं लिहावे. खांद्यावर झेंडा घेऊन समाजसेवा करण्यापेक्षा आपापल्या क्षेत्रात काम करणे ही समाजसेवाच आहे. प्रेम करावेसे वाटणे आणि कविता लिहिणे हे सजीव असण्याचे लक्षण असते’, अशा शब्दांत कवी संदीप खरे यांनी उपस्थितांना कवितेच्या गावाची सफर घडवली.रसिक साहित्य परिवारातर्फे संदीप खरे यांच्या ‘मी अन् माझा आवाज’ या नव्या कवितासंग्रहाचे प्रकाशन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व जितेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संदीप खरे व जितेंद्र जोशी यांनी कवितांचे वाचन करत वातावरण काव्यमय केले.‘शब्द जड वापरले की कविता उत्तम होत नाही, तर साधी सोपी कविताही जगण्याचा संदेश देऊन जाते’, असे सांगत खरे यांनी त्यांच्याच कवितांची उदाहरणे दिली. ‘एखादा कवी संगीतकाराबरोबर त्याच्याच कविता चालबद्ध करून दीड हजारांहून अधिक कार्यक्रम करतो, या गोष्टीचा अनेकांना त्रास होतो.कवीला चांगले पैसे मिळत असतील तरी कुणकुण सुरू होते. एखादा कवी त्याच्या प्रतिभेचे चांगले पैसे घेत असेल तर तुमच्या बापाचे काय जाते,’ असा खोचक सवालही जोशी यांनी उपस्थित केला.मृणाल कुलकर्णी आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले. जी कलाकृती लोकाभिमुख होते तीच अधिक सुंदर असते. मराठी शब्दांचे भांडार वापरून कविता करणारे ज्येष्ठ कवी आणि संदीप खरे यांच्यासारखे कवी हे एका पातळीवर असायला हवेत, असे सलील कुलकर्णी यांनी सांगितले. मृणाल कुलकर्णी यांनी ‘सायकल’ या कवितेचे वाचन केले.
शहाण्यासारखे जगावे, वेड्यासारखे लिहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:10 IST