जखमींना मिळणार उपचारांचा खर्च
By Admin | Updated: August 6, 2015 03:40 IST2015-08-06T03:40:54+5:302015-08-06T03:40:54+5:30
शिरूर-चौफुला रस्त्यावर आंबळे शीवेजवळ एसटी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातातील जखमींना उपचारांचा सर्व खर्च मिळणार असल्याचे आश्वासन एस टीचे

जखमींना मिळणार उपचारांचा खर्च
शिरूर : शिरूर-चौफुला रस्त्यावर आंबळे शीवेजवळ एसटी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातातील जखमींना उपचारांचा सर्व खर्च मिळणार असल्याचे आश्वासन एस टीचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिले आहे़
शिरूर-चौफुला ही एसटी बस चौफुलाकडून शिरूरकडे येत असताना आंबळे शीवेजवळ झाडाला धडकून बसचा अपघात झाला होता. यात वाहक, चालकासह १६ जण जखमी झाले होते. या जखमींना येथील मातोश्री मदनबाई धारीवाल व विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार बाबुराव पाचर्णे यांनी धारीवाल रुग्णालयात जखमींची भेट घेतली असता जखमींच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाविषयी त्यांच्याकडे तक्रार केली होती. जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये दिले. मात्र पुढील खर्चाविषयी काहीच स्पष्ट करण्यात आले नसल्याचे पाचर्णे यांना सांगण्यात आले. यावर पाचर्णे यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व जखमींना उपचाराचा सर्व खर्च दिला जावा, अशा सूचना केल्या.
त्यानंतर चव्हाण यांनी जखमींची भेट घेऊन जखमींना मदतीबाबत आश्वस्त केले. शिरूर आगाराचे व्यवस्थापक एम. आर. नगराळे यांनी सांगितले, की आमदार पाचर्णे यांच्या सूचनेनुसार जखमींना मदतीसाठी असणारे ‘पी’ फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. जखमींचा जो काही खर्च होईल तो त्यांनी प्रथम रुग्णालात जमा करायचा आहे. त्यानंतर ‘पी’ फॉर्म भरून विभागीय नियंत्रण विभागाकडे जमा करायचा आहे. तेथे नियुक्त समिती हा खर्च मंजूर करते. यामुळे जखमींना संपूर्ण खर्चाची रक्कम मिळणार आहे. एसटी अपघाताबाबत पावसाळी अधिवेशनात नवीन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानुसार अपघातात मृत पावल्यास मृताच्या नातेवाईकांना आता ५ लाख रुपये मिळणार आहेत. जखमींचा संपूर्ण खर्च महामंडळाला करावा लागणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.