‘फ्री सोल ग्रुप’ला ‘वर्ल्डस्टे फेस्ट रायडर्स’ किताब
By Admin | Updated: January 6, 2015 00:14 IST2015-01-06T00:14:36+5:302015-01-06T00:14:36+5:30
यशासाठी आवश्यक असलेला संयम व कार्यक्षमतेची जाणीव करून देणाऱ्या अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान पुण्यनगरीतील चार युवक व एका महिला दुचाकीस्वारांनी पेलले.

‘फ्री सोल ग्रुप’ला ‘वर्ल्डस्टे फेस्ट रायडर्स’ किताब
सहकारनगर : तरुणाईला वेळेचे भान शिकविणारी जिद्द व चिकाटी, शाश्वत यशासाठी आवश्यक असलेला संयम व कार्यक्षमतेची जाणीव करून देणाऱ्या अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान पुण्यनगरीतील चार युवक व एका महिला दुचाकीस्वारांनी पेलले. अवघ्या तेवीस तासांत १,६४२ किलोमीटर अंतर कापून त्यांनी 'वर्ल्डस्टे फेस्ट रायडर्स' होण्याचा किताब पटकावला आहे.
अमेरिकेतील 'आयर्न बट' असोसिएशनचे आव्हान जगभरातील हौशी दुचाकीस्वार स्वीकारतात आणि प्रशस्तिपत्र मिळवतात. वर्षाकाठी जगभरातील हजारो युवक हा प्रयत्न करतात. वेगावर नियंत्रण, मद्यपानविरहित केवळ एकच यु टर्न घेण्याचा नियम असलेल्या या मोहिमेत चोवीस तासांत सोळाशे दहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. ते आव्हान पुण्यातील या पाच युवकांनी स्वीकारले. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर तीन जानेवारीला पहाटे तीन वाजता ही मोहीम सुरू झाली. आंबेगावचा रोहन पानगंटी, तळजाई पठारचा नरेश कांबळे, हडपसरचे जयप्रकाश व अनुली मुळे हे दाम्पत्य आणि नरेश तांबडे यांनी 'सॅडल सोर' या मोहिमेला सुरुवात केली. चोवीस तासांत 'मिशन सोळाशे किलोमीटर' या मोहिमेसाठी बेंगलोरकडे जायला निघाले. (वार्ताहर)
असा केला प्रवास...
चार बुलेटवरून पाचजण कडाक्याच्या थंडीत निघाले. सुरूवातीचा प्रवास वेगवान झाला. तीन तासांत त्यांनी कोल्हापूर गाठले. मध्येच त्यांना पावसाचा तडाखा बसला. मात्र, न डगमगता थेट बेळगावनंतर तब्बल बारा तासांनी बेंगलोर गाठले. यु टर्न घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. चार जानेवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबेगाव येथे सर्वजण पोहोचून हा बहुमान मिळविला.