भीमा पाटसच्या कामगारांचा एल्गार
By Admin | Updated: October 30, 2016 02:47 IST2016-10-30T02:47:06+5:302016-10-30T02:47:06+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २० कोटी रुपये देणी थकविल्याच्या निषेधार्थ कारखान्याच्या कामगारासह त्यांच्या कुटुंबीयांनी मूक मोर्चा काढला.

भीमा पाटसच्या कामगारांचा एल्गार
पाटस : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २० कोटी रुपये देणी थकविल्याच्या निषेधार्थ कारखान्याच्या कामगारासह त्यांच्या कुटुंबीयांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात कामगारांच्या कुटुंबीयांतील महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कारखानास्थळावरून मोर्चा निघाला. हा मोर्चा पाटस गावात आल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि काही ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. या वेळी भीमा पाटस कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिवंगत मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्याला रमेश थोरात, योगेंद्र शितोळे, सत्वशील शितोळे यांनी पुष्पहार समर्पित केला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी भीमा कामगार संघाचे पदाधिकारी केशव दिवेकर यांनी प्रास्ताविक करून कामगारांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती सांगून याला जबाबदार कारखाना व्यवस्थापन असल्याचे दिवेकर म्हणाले. या वेळी भीमा कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर, कामगार संघटनेचे पदाधिकारी, सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच मंगेश दोषी, माजी सरपंच शीतल भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रमेश थोरात म्हणाले, की कारखाना व्यवस्थापनाने कामगार आणि सभासदांवर वाईट वेळ आणली आहे. मीदेखील या कारखान्यात उपाध्यक्ष होतो. मात्र आमच्या कारकिर्दीत कामगारांचे पगार कधीही थकले नाहीत, तर सभासदांच्या उसाला योग्य भाव दिला होता. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी किती पारदर्शक कारभार केला, याचे उदाहरण म्हणजे कामगारांची थकलेली देणी आणि सभासदांच्या भावनेशी केलेली थट्टा होय. (वार्ताहर)
कामगारांवर काळी दिवाळी
भीमा साखर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत वाबळे म्हणाले, की कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कामगारांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.
भीमा पाटस कारखान्यात तांत्रिक अडचणीमुळे नुकसान झाले. त्यामुळे गाळपही कमी झाले. परिणामी कारखाना अडचणीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यात कोणीही राजकारण करू नये.
- आमदार राहुल कुल, अध्यक्ष, भीमा पाटस कारखाना.