दुप्पट टोलवसुलीच्या नावाखाली कामागार करताहेत लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:34+5:302021-02-23T04:16:34+5:30
पुणे : देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनांकडून रोख रक्कम न घेता फास्टॅग बंधनकारक केले आहे. १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग ...

दुप्पट टोलवसुलीच्या नावाखाली कामागार करताहेत लूट
पुणे : देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनांकडून रोख रक्कम न घेता फास्टॅग बंधनकारक केले आहे. १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग नसेल तर दुप्पट रक्कम भरण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे दुप्पट वसुलीमुळे टोल नाक्यावर तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन खेडशिवापूर टोलनाक्यावरील कामागार दुप्पट रक्कम भरू नका त्याऐवजी काही पैसे द्या व पावती घेऊ नका असे सांगून वाहनांना सोडून देतात. यामुळे सरकारलाच लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप एका वाहनधारकाने केला आहे.
चारचाकी वाहनाला फास्टॅग बसविला नाही. नवीन नियमानुसार दुप्पट १९० रुपयांचा टोल भरावा लागेल. जर १०० रुपये भरले तर तुमची गाडी सोडून देतो. मात्र, पावती देणार नाही. असेच अनेक वाहनचालकांना आम्ही सोडून देतो. त्याप्रमाणे तुमचे पैसे देखील वाचतील, असे खेडशिवापूर टोल नाक्यावरील टोल वसूल करणाऱ्या एका कामगाराने संबंधित वाहनचालकाला सांगितले. आणि पैशांची मागणी केली. यावर वाहनचालकाने संताप व्यक्त करीत टोल नाक्यावरील नोंदवहीत तक्रार दाखल केली आहे. तसेच सोबत चारचाकीत असलेल्या प्रवाशाने वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ट्विटरवरून तक्रार केली आहे.
टोल नाक्यावर वसुलीसाठी स्थानिकांचीच दादागिरी
असा लाजिरवाणा प्रकार टोल नाक्यावर घडत असल्याने कामगारांचे चांगलेच फावते आहे. खुलेआम सरकारची लूट सुरू असून सर्रास नियम तोडले जात आहेत. यामुळेच टोलवसुली होण्यास वेळ लागत आहे. स्थानिक नागरिकच टोल नाक्यावर टोलवसुलीसाठी असतात. त्यामुळे अनेकदा दादागिरी देखील केली जाते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वाहनचालकाने केली आहे.