वासुंदे-बारामती रस्त्याचे काम रखडले
By Admin | Updated: May 23, 2014 05:10 IST2014-05-23T05:10:46+5:302014-05-23T05:10:46+5:30
रोटी ते वासुंदेपर्यंतचे (ता. दौंड) सुरू केलेले डांबरीकरणाचे काम पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप पूर्ण झाले नाही.

वासुंदे-बारामती रस्त्याचे काम रखडले
वासुंदे : रोटी ते वासुंदेपर्यंतचे (ता. दौंड) सुरू केलेले डांबरीकरणाचे काम पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप पूर्ण झाले नाही. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा या मार्गावरुन जाण्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी या रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने या मार्गावरुन प्रवास करणे खडतर झाले आहे. या मार्गाचे अनेक वर्षांपासून काम न झाल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत वारंवार या मार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशी, वाहन चालक तसेच स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या पाटस-वासुंदे बारामती या राज्य मार्ग क्र.२३ चे वासुंदे पासून ८३०० मीटर लांबीच्या व ७ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०१३ अंतर्गत ३ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उर्वरीत अंतरातील मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. साईड पट्ट्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)