कोरोना काळात 76 टक्के परिचरिकांवर कामाचा ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:18+5:302020-12-08T04:11:18+5:30
साथी संस्थेतर्फे सर्वेक्षण : अनुसंधान ट्रस्टच्या एथिक्स कमिटीची मान्यता पुणे : कोरोना काळात खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या ...

कोरोना काळात 76 टक्के परिचरिकांवर कामाचा ताण
साथी संस्थेतर्फे सर्वेक्षण : अनुसंधान ट्रस्टच्या एथिक्स कमिटीची मान्यता
पुणे : कोरोना काळात खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेसना विविध आव्हानांचा सामना करावा लागला. साथी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात 76 टक्के महिलांनी कामाचा ताण वाढल्याचे, तर 65 टक्के महिलांनी गरजेच्या वेळीही रजा मंजूर होत नसल्याचे सांगितले. याशिवाय, व्यवस्थापनाचा दबाव, सुरक्षा साधनांचा अभाव अशा अडचणींचाही त्यांना सामना करावा लागल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनादरम्यान रुग्णालयात काम करताना परिचारिकांना आलेल्या आव्हानांचा साथी संस्थेतर्फे अभ्यास करण्यात आला. साथी संस्थेच्या संशोधक श्वेता मराठे, दीपाली सुधींद्र, स्वाती राणे आणि अभय शुक्ला यांनी या सर्वेक्षणाची जबाबदारी सांभाळली. या अभ्यासात महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना काळात काम करणाऱ्या नर्सेसचे ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले. एकूण 367 नर्सेसनी सर्वेक्षणात भाग घेतला. त्याचबरोबर नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन, नर्सेसना नियुक्त करणारे सरकारी अधिकारी तसेच खासगी रुग्णालयांमधील अधिकारी अशा एकूण पाच जणांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या गेल्या. या अभ्यासासाठी अनुसंधान ट्रस्टच्या एथिक्स कमिटीची मान्यताही मिळाली आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 367 नर्सेस पैकी 88 टक्के महिला होत्या. सर्वेक्षणात ग्रामीण भागातून 47.1 टक्के तर शहरी भागांमधून 52.9 टक्के नर्सेसनी सहभाग घेतला. यामध्ये सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सेसचे प्रमाण 70 टक्के तर खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या 23 टक्के नर्स होत्या.
सर्वेक्षणात 76% नर्सेसनी कोरोना काळात जास्तीचे काम करावे लागले, असे सांगितले. 65% नर्सेसनी काळात गरजेच्या वेळी रजा मंजूर होत नव्हती, 17% नर्सेसनी सलग दोन शिफ्ट ड्युटी कराव्या लागल्या आणि 39% नर्सेसनी कामाच्या वेळेत वाढ झाल्याचे सांगितले. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 56% नर्सेसनी सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचे सांगितले तर 20 टक्के नर्सेसनी पगारात कपात झाल्यास आणि 20 टक्के नर्सेसनी व्यवस्थापनाकडून दबाव आल्याचे सांगितले.
एकूण नर्सेसपैकी 64% जणी दररोज सहा ते दहा तास काम करत होत्या. 29% नर्सेस दररोज दहा तासांपेक्षा जास्त वेळ काम करत होत्या. 57% नर्सेसना दररोज सरासरी 12 रुग्ण बघावे लागत होते तर 31% नर्सेसना दररोज सरासरी 20 रुग्णांकडे बघावे लागत असल्याचे सांगितले.