पुणे बार असोसिएशनचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: March 17, 2015 00:19 IST2015-03-17T00:19:13+5:302015-03-17T00:19:13+5:30
अलाहाबाद येथे पोलिसांनी वकिलांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले.

पुणे बार असोसिएशनचे काम बंद आंदोलन
पुणे : अलाहाबाद येथे पोलिसांनी वकिलांवर केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ जिल्ह्यातील वकिलांनी सोमवारी न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच नेहमीपेक्षा शुकशुकाट जाणवत होता. रोजची रिमांडची कामे व काही तातडीची न्यायालयीन कामकाज वगळता वकिलांनी शंभर टक्के हा बंद पाळला.
सकाळपासूनच बार कौन्सिल आॅफ इंडियाने सर्व राज्यांतील बार कौन्सिलना पत्र पाठवून सोमवारी उच्च, सत्र न्यायालयांच्या कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार पुणे बार असोसिएशननेही कामकाज बंद ठेवल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी सांगितले.
उपाध्यक्ष हेरंब गानू, अॅड. योगेश पवार, सचिव अॅड. राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे, खजिनदार अॅड. साधना बोरकर, आॅडिटर अॅड. संजीव जाधव व कार्यकारिणी सदस्य आणि संपूर्ण वकील संघटनेच्या सभासदांंनी या आंदोलनात सहभाग घेतला.
मागील १५-१८ वर्षात बार कौन्सिल आँफ इंडियाने कामकाज बंदसाठी आवाहन केल्याची आठवण नाही. ही दुर्मिळ बाब होती. त्यामुळे वकिलांनी कामकाज बंदमध्ये साहजिकच सर्व जण सहभागी होणार हे निश्चित असल्याच्या भावना वकिलांनी व्यक्त केल्या.
अलाहाबाद येथे वकिलांवर गोळीबार व लाठीमार करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ बार कौन्सिलने ठराव केला आहे. त्यानुसार पुणे बार असोसिएशनने हे आंदोलन केले आहे. तसेच वकिलांच्या सुरक्षेबाबत ठोस पाऊल उचलण्यासाठी सर्वोच्च न्यायालय, गृहमंत्री व महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवदेन देणार असल्याचे अॅड. शेडगे यांनी सांगितले.