मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:11 IST2021-08-01T04:11:13+5:302021-08-01T04:11:13+5:30

पुणे- शिवाजीनगरकडून येणाऱ्या मेट्रोच्या भूयारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम शनिवारी दुपारी कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले. पहिल्या बोगद्याचे काम पंधरा ...

Work on Metro's second subway completed | मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण

मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण

पुणे- शिवाजीनगरकडून येणाऱ्या मेट्रोच्या भूयारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम शनिवारी दुपारी कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले. पहिल्या बोगद्याचे काम पंधरा दिवसांपुर्वीच पूर्ण झाले आहे. कसबा पेठेतील साततोटी पोलिस चौकीसमोरच्या या जागेत मेट्रोचे नियोजित भूमिगत स्थानक आहे.

जमिनीखाली ३३ मीटर अंतरावर खोदलेल्या खड्ड्यातून शनिवारी दुपारी ४ वाजता भूयाराचे खोदकाम करणारे टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन) बाहेर आले. प्रकल्प संचालक अतूल गाडगीळ, संचालक हेमंत सोनवणे तसेच मेट्रोचे अन्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. टीबीएम बाहेर येताच ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

मेट्रोचा भूयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ६ किलोमिटरचा आहे. त्यात दोन बोगदे ( जाणाऱ्या व येणाऱ्या मेट्रोसाठी) आहेत. कृषी महाविद्यालयाकडून बोगद्याचा उतार सुरू होतो. प्रत्यक्ष बोगदा शिवाजीनगरपासून सुरू होतो. सिव्हील कोर्ट व नंतर मुठा नदीपात्र ओलांडून आता दोन्ही बोगदे कसबा पेठेपर्यंत पूर्ण झाले आहेत. नदीच्या तळापासून खाली १३ मीटर अंतरावरून दोन्ही बोगदे पुढे कसबा पेठेपर्यंत आले आहेत.

स्वारगेटकडूनही या भूयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यातील एक बोगदा मंडईपर्यंत आला आहे. त्याचे काम आता पुढे कसबा पेठेपर्यंत येईल. स्वारगेटकडून येणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. कसबा पेठेतील नियोिजत स्थानकार हे चारही बोगदे एकत्र झाले की मेट्रोचा ६ किलोमीटरचा सलग भूयारी मार्ग पुर्ण होईल. भूयारी स्थानकांच्या कामासहित संपुर्ण काम पुर्ण होऊन भूयारातून मेट्रो धावण्यासाठी अजून वर्ष ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Work on Metro's second subway completed