खानवटे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू
By Admin | Updated: February 9, 2017 02:56 IST2017-02-09T02:56:46+5:302017-02-09T02:56:46+5:30
खानवटे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू झाले आहे. दौंड तालुक्यातील तसेच कर्जत, करमाळा नागरिकांना पुणे-सोलापूर महामार्गाला

खानवटे रेल्वे उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू
राजेगाव : खानवटे येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू झाले आहे. दौंड तालुक्यातील तसेच कर्जत, करमाळा नागरिकांना पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या भिगवण-राशीन रस्त्यावर असणाऱ्या या पुलाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत ‘लोकमत’ वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर जुलै २०१६ मध्ये येथील शेतकऱ्यांनी सेवा रस्ता तयार करण्यासाठी व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी उड्डाणपुलासाठी जाणार आहेत. त्या जमिनींचे संपादन करून भरपाई देण्यासाठी आंदोलन करून काम बंद केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे जात असताना (दि. २४ जुलै) येथे थांबून शेतकऱ्यांकडून समक्ष माहिती घेतली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने मार्गी लागल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांकडून समजली. येथे उड्डाणपूल नसल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, प्रवासी यांची होणारी गैरसोय लवकरच संपणार आहे. याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कंपनीचे अभियंता व कामगार अहोरात्र अद्ययावत मशिनरी व यंत्रणेसह राबवत आहे. विलंबाने सुरू झालेले काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी काम वेगात सुरू आहे. शेतकरी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. (वार्ताहर)